नितेश राणे…,तुमच्या मतदारसंघाचे बघा, आमच्याकडे “ढवळाढवळ” नको – आमदार दीपक केसरकर

0
17

 

सिंधुदुर्ग – माझ्या निवडणूकीत गोव्याचे मुख्यमंत्री आले तरी काय फरक पडला नाही, तर तुम्ही येऊन काय होणार. माझ्या मतदारसंघात “ढवळाढवळ” करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मतदारसंघांतील रस्ते बघा, असा टोला आमदार दिपक केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान कोणी कितीही प्रयत्न केला तरी येणाऱ्या निवडणुकात सावंतवाडीत चमत्कार दिसेल, शहराला झोपडपट्टीचे स्वरूप आणण्याचे काम येथील सत्ताधारी करत आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.केसरकर बोलत होते.यावेळी त्यांनी राणे यांच्या मतदार संघातील रस्ते व अन्य कामाचे फोटोच पत्रकारांना दाखवले.

ते पुढे म्हणाले, स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून भाजपाचे आमदार नितेश राणे याठिकाणी ढवळाढवळ करत आहेत. रस्त्यांची दुरवस्था संपूर्ण जिल्ह्यातीलच परिस्थिती आहे. मात्र केवळ सावंतवाडी मतदार संघातीलच रस्ते खराब आहेत, असे भासवले जात आहे.

त्यामुळे दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावा. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत, असे सांगत त्यांनी ते पत्रकारांसमोर ठेवले.

तर बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर झाली आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम होऊ शकले नाही. ते आता सुरू होईल, हे माहीत असताना केवळ श्रेय घेण्यासाठी विरोधकांची आंदोलने-उपोषणे सुरू आहेत. अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here