दुचाकीला कारची धडक,आईसोबत निघालेला 4 वर्षांच्या ध्रुवचा मृत्यू ;आईही गंभीर झाराप पत्रादेवी बायपास मार्गावर अपघात

0
411

 

सिंधुदुर्ग : माणगाव येथून मळगाव येथील आपल्या माहेरी ज्युपिटर दुचाकीने येत असताना पाठीमागून वेगाने येणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात माणगाव येथील मुग्धा पावसकर या जखमी झाल्या. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा ध्रुव गौरव पावसकर (वय 4 वर्षे) याचे रात्री उशिरा उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे दुदैवी निधन झाले.

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील स्वामी घाबा सर्कलवर गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला होता.माणगांव येथील गौरव पावसकर हे एम्. आर. म्हणून काम करतात. माणगाव दत्तमंदिर स्टॉप जवळ ते राहतात. त्यांची पत्नी सौ. मुग्धा पावसकर पूर्वाश्रमीच्या मुग्धा नाटेकर या गुरुवारी सायंकाळी उशिरा मळगांव रस्तावाडा येथील आपल्या माहेरी येत होत्या. त्यांचे आईवडिल पुणे येथे मुलासोबत राहतात. दिवाळी निमित्त ते मळगांव येथील घरी आले होते.तसेच मोठी बहीणही आली होती. या सर्वांना भेटण्यासाठी त्या आपल्या ज्युपिटर दुचाकीने येत होत्या.

त्या मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील सर्कल वरून मळगावच्या दिशेने वळत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कारची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात मुग्धा हिच्या कंबर व पायाला मोठी दुखापत झाली होती. तर मुलगा ध्रुव हा रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांनाही प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ध्रुव गंभीर जखमी असल्याने त्याला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान ध्रुव याचे रात्री दुर्दैवी निधन झाले. चार वर्षांचा ध्रुव हा बोलका, खेळकर व सर्वांचा लाडका होता. त्याच्या अपघाती निधनाने पावस्कर कुटुंबीयांवर जणू दुःखाचा पहाडच कोसळला आहे. तसेच माणगाव गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत असून अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन चालकाविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here