सिंधुदुर्ग – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात तापलेल्या राजकीय वातावरणामुळे आता आज होणार्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता कणकवली पोलीसांकडून पावले उचलण्यात येऊ लागली आहेत.
त्या अनुषंगाने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कलम 149 अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार मनाई आदेश लागू असल्याने विजयी मिरवणुका काढू नयेत, असेही आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
तसेच मनाई आदेश लागू असल्याने पाच पेक्षा जास्त लोक एकत्र जमू नयेत असे या नोटीसमध्ये कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान जर मनाई आदेशाचा भंग केला तर प्रचलित कायद्यानुसार कारवाईचा इशारा देखील या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना या नोटिसा त्या त्या पोलिस स्टेशन मार्फत बजावण्यात येत आहेत. यात कणकवली तालुक्यात सर्वाधिक नोटीस बजावण्यात आल्या आहेत.या नोटीसीचा भंग करणे महागात पडणार असून कठोर कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे.