सिंधुदुर्ग – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राज्यात लक्षवेधी झालेल्या निवडणुकीनंतर या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धक्कातंत्र पुन्हा एकदा अनुभवता आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या महत्त्वाच्या व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या निवड प्रक्रिया वेळी महाविकास आघाडीच्या संचालक नीता राणे या अनुपस्थित राहिल्या.
त्यामुळे या निवडणुकीत अकरा विरुद्ध सात असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे एकीकडे राणें कडून नियोजनबद्ध रणनिती आखली जात असतानाच निता राणे ह्या अनुपस्थित राहण्यामागे आता वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धक्कातंत्राचा पूर्वी अनेकदा अनेकांना अनुभव आला आहे. असे असताना निता राणे यांची अनुपस्थिती ही सुद्धा राणेंच्या धक्कातंत्राचा भाग आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसच्या कोट्यातून महा विकास आघाडीच्या संचालक असलेल्या निता राणे या बैठकीला अनुपस्थित राहण्या मागील नेमकी कारणे काय? निता राणे यांनी गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली की? अन्य काही कारणांमुळे त्या गैरहजर राहिल्या? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून जिल्हा बँकेच्या या अध्यक्ष निवडी वेळी देखील महाविकासआघाडी तील तीन पक्ष एकत्र येऊन आपले सर्व संचालक टिकवू शकले नाहीत असेही आता बोलले जात आहे.