गावठी सुपारीच्या लागवडीकडे कोकणातील तरुणांचा कल • गावठी सुपारीला ३५० चा भाव • बाजारी सुपारी पोहचली ४०० वर

0
466

 

कोकण म्हणजे नारळी पोफळींचे आगर समजले जाते. पाटाच्या नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोकणात नारळी पोफळीच्या बागा उभ्या राहील्या. कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम या बागांनी केले आहे. पाटाच्या पाण्यामुळे नेहमीच हिरव्यागार राहणाऱ्या बागांचे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना देखील मोठे आकर्षण असते. एकेकाळी कोकणात भातशेतीसह हापूस आंब्या एवढेच सुपारीचे उत्पादन घेतले जात होते. मात्र १९८२ आणि ८३ या कालावधीत पाठोपाठ झालेल्या भूस्खलनामुळे सुपारीच्या बागांचे खूप मोठे नुकसान झाले आणि यात येथील सुपारी बागायतदार अक्षरशः उध्वस्त झाला. गेल्या काही वर्षात मात्र सुपारीला असलेली वाढती मागणी आणि मिळणारा अपेक्षित भाव लक्षात घेऊन येथील तरुण बागायतदार सुपारी लागवडीकडे वळला असून सध्या गावठी सुपारीचा दर ३५० रुपये किलो एवढा वधारला आहे .
हापूस आणि काजू लागवडीच्या आधी पासून कोकणचे अर्थकारण हे सुपारीच्या उत्पादनावर अवलंबून होते. फळबाग लागवडीच्या शासकीय मदत योजना आल्यानंतर कोकणात सुपारीकडे दुर्लक्ष होवून आंबा आणिकाजूच्या लागवडीवर सर्वाधिक भर दिला गेला. परिणामी सुपारीच्या नव्या लागवडीकडे दुर्लक्ष झाले. आंबा आणि काजूचे उत्पादन केवळ पाच वर्षात मिळू लागते. तुलनेत सुपारीचे उत्पादन सुरु होण्यास १५ ते २० वर्षांचा कालावधी लागतो. सुपारीच्या तुलनेत आंबा आणि काजू यांना झटपट आणि अपेक्षेपेक्षाही अधिक दर मिळत असल्याने या दोन्ही फळझाडांची कोकणात प्रचंड लागवड झाली आणि सुपारीच्या उत्पादनातील अर्थकारणाची जागा हापूस आंबा आणि काजूने घेतली.
कोकणात सुपारीची सर्वाधिक लागवड दापोली , गुहागर आणि पाठोपाठ राजापूर तालुक्यात आहे. सुपारीच्या नवनवीन जातींचा शोध लागल्यानंतर त्याचे उत्पादन मिळण्याचा कालावधी पूर्वी पेक्षा कमी झाला. कोकणातील तरुण शेतकऱ्यांनी सुपारीच्या या नवनवीन जातींचा शोध लागल्यानंतर सुपारी लागवडीवर भर देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात जरी गुटखा, पानमसाल्यांवर बंदी आली असली तरी, कोकणातील सुपारीला गुजरात आणि अन्य राज्यात मागणी वाढल्याने पूर्वी किलोला केवळ २०० ते २५० रुपये मिळणारा भाव वाढत जात आता थेट ३५० रुपये किलोवर पोहचला आहे. बाजारी सुपारीचा दर ३७५ ते ४०० रुपये एवढा स्थिर असल्याने गावठी सुपारी देखील बाजारातील आपली पत टीकवून आहे.
सुपारी बागांवर देखील वेगवेगळे रोग पडत असल्याने त्याचा सुपारी उत्पादनावर मोठा परिणाम होतो. मात्र तरुण आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी सुपारीवर देखील फुलोऱ्या प्रसंगी तसेच फळधारणे दरम्यान विविध औषधी फवारण्या करण्याची पध्दत सुरु केल्याने गावठी सुपारीचे उत्पादन वाढविण्यास मोठी मदत झाली आहे. ठिबक सिंचन सारख्या पाणी देण्याच्या नवीन पध्दती आल्याने पाण्याचे नियोजन करणेही तुलनेत खूपच सोपे झाले आहे. कोकणात वानर आणि माकडांचा शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांना असणारा त्रास सर्वश्रुत आहे तुलनेत सुपारीला वानर माकडे शिवत नसल्याने सुपारी लागवडीवर अधिक भर दिला जात आहे . सुपारीच्या झावळ्यांपासून बांधलेल्या झाडूंनाही एका नगास ५० ते ६० रुपये एवढा दर मिळत असल्याने फावल्या वेळात घरातील माणसे झाडू बांधणीचा उद्योग करीत आहेत.

अमित पाध्ये ( सुपारी उत्पादक ) :-
सुपारीच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाश आवश्यक असल्याने आपल्या बागेतील अनावश्यक अन्य झाडे आपण कमी केली. परिणामी पूर्वीचीच सुपारीची झाडे अधिक उत्पादन देवू लागली आहेत. याबरोबरच अनावश्यक झाडे काढून टाकल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेत आपण सात ते आठ वर्षात उत्पन्न देणाऱ्या नव्या जातींची लागवड केली आहे. सध्या आपल्याकडील गावठी सुपारीला किलोला ३५० रुपये दर मिळत असल्याने आपण सुपारी लागवडीवर अधिकाधिक भर दिला असल्याची माहिती कृषी पदवीधारक तरुण शेतकरी अमित पाध्ये यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here