सिंधुदुर्ग – कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या बंद केल्याने प्रवाशांची मदारही केवळ खाजगी प्रवासी वाहतूकदारांवर अवलंबून आहे. मुंबईकडे जाण्यासाठी सध्या बाराशे ते पंधराशे रुपये तिकीट आकारली जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना आता खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील गणेशोत्सवातील जादा गाड्या 5 सप्टेंबरपासून बंद झाल्या. गेले चार महिने सुरू असलेल्या मंगला एक्सप्रेस आणि नेत्रावती या गाड्यांचा मार्ग अजूनही सुरक्षित झालेला नाही. गोवा – पेडणे बोगद्याचे काम दुरूस्तीचे काम लांबल्याने गाड्या बंद आहेत. या मार्गावरील दोन्ही गाड्या सध्या इतर मार्गावर वळविल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता खाजगी प्रवासी वाहतूकीवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटी महामंडळाकडे प्रवासी येत नसल्याने आणि बससाठी 22 प्रवाशांची संख्या अपेक्षित असल्याने एसटीच्या मर्यादा आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात मुंबईकडे जाण्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतुकीवर चाकरमान्यांना अवलंबून रहावे लागत आहे.
सध्या कणकवली ते मुंबई हा दर बाराशे ते पंधराशे असा आहे. रविवारी आणि सुटीच्या दिवशी या दरांमध्ये कमालीची वाढ केली जाते. सध्या तर तीस ते पस्तीस प्रवासी या गाड्यांमधून कोंबून नेले जात आहेत. एसटीकडे मात्र 22 प्रवासी अपेक्षित आहेत; पण चाकरमान्यांना मुंबईकडे जाण्यासाठी दुसरी कोणतीही सुविधा नसल्याने बाराशे ते पंधराशे रुपये भाडे आकारून मुंबई गाठावी लागत आहे.
मुंबईकडे जाण्यासाठी मालवण ते मुंबई या मार्गावर एसटीबस नियमित धावत आहे. प्रवाशांनी या एसटीबसचा लाभ घेतला पाहिजे, अशी अपेक्षा विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केली आहे. मालवण येथून सकाळी सुटून संध्याकाळी ही गाडी मुंबईला पोहचते. या गाडीला कणकवली ते दादरपर्यंत 785 रूपये तिकीट आकारले जाते.