सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव येत आहेत. यामुळे कणकवली नागरपंचतीने खबरदारी म्हणून मंगळवारचा होणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, सुरवातीला कणकवली शहरात कोरोनाचे २० ते २५ रुग्ण दर दिवशी आढळून येत होते. मध्यंतरी आम्ही शहरात जनता कर्फ्यू पाळला त्यावेळी रुग्ण मिळण्याची संख्या झिरो वरती आली होती. आता पुन्हा एकदा रुग्ण मिळू लागले आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचे हे संकट वाढू नये यासाठी आम्ही आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहोत. मागील आठवड्यात बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना आठवडा बाजार बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. कारण परराज्यातून,परजिल्ह्यातून येणाऱ्या विक्रते व त्यांच्या मालामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. नागरिकानीही खरेदीसाठी गर्दी करुन कोरोनाचा संसर्ग होऊ नये. म्हणुन मंगळवारचे होणारे चार बाजार डिसेंबर अखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे. असे ते यावेळी म्हणाले.
बेळगाव, सांगली, कोल्हापूर या भागातील विक्रेते या बाजारात येतात. त्यांच्याच माध्यमातून हा बाजार भरतो. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कणकवलीत खबरदारी म्हणून व्यापारी आणि नगरपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान आज बाजारात बाहेरून कोणीही विक्रेते आले नाहीत त्यामुळे बाजारात फारशी वर्दळ देखील दिसून आली नाही.