कुडाळ एमआयडीसीत रेल्वे रुळ पाण्याखाली कोकणरेल्वेच्या सर्व गाड्या अडकल्या तीन तास उशिराने धावणार गाड्या : रेल्वे प्रशासनाची माहिती

0
252

सावंतवाडी : गुरुवारी सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांनाही बसला. कुडाळ एमआयडीसी येथे रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्याने मुंबईतून येणारी जनशताब्दी एक्सप्रेस व अन्य मार्गस्थ होणाऱ्या सर्व गाड्या कुडाळ तसेच झाराप व सावंतवाडी येथे अडकून पडल्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बराच कालावधी झाला तरी रेल्वे गाड्या मार्गस्थ होत नसल्याने काही लोकांनी गाडीतून उतरून पर्यायी मार्ग स्वीकारला.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनानेही कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या ३ तास उशिराने धावतील असे जाहीर केले आहे. यात मडगाव जंक्शन येथून निघणारी ट्रेन क्र.०११४० मडगाव जंक्शन ते नागपूर विशेष गाडी सायंकाळी ७ वाजता ऐवजी रात्री १० वाजता निघणार आहे.
तर ट्रेन क्र. २०११२ मडगाव जं. ते मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस मडगाव जं. येथून सायंकाळी ६ वाजता ऐवजी रात्री ९ वाजता सुटेल. तर ट्रेन क्र. ११००४ सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्स्प्रेसचा सावंतवाडी येथून सायंकाळी ५.५५ वाजता मार्गस्थ होण्या ऐवजी ती रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी मार्गस्थ होणार आहे. या सर्व गाड्या तीन तास उशिरा धावणार असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कुडाळ एमआयडीसी येथे रेल्वे रुळावर पाणी आल्याने कुडाळ रेल्वे स्थानकात अडकून पडलेली जनशताब्दी एक्सप्रेस सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. पहाटे मुंबई येथून मार्गस्थ झालेली ही गाडी बारा तास उलटून गेले तरीही गोवा येथे पोहोचली नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here