21 C
Panjim
Monday, January 24, 2022

काजु बाबत बागायतदार, कारखानदारांमध्ये एकमत नाही

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – काजूचा दर ठरविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या बैठकीत अखेर काजुबाबत बागायतदार, कारखानदारांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यावेळी काजू कारखानदारांतर्फे महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनने दर ठरवून दिले असले तरी किमान १२० रुपये किलो दर मिळावा अशी बागायतदारांची मागणी आहे. शेवटी काही तोडगा निघत नसल्याने  वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी नवे दर परवडतील त्यांनी काजू घालावा. बाकीच्यांनी दर वाढेपर्यंत काजू घालू नये असा मार्ग सुचवला आहे.

येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात जिल्हय़ातील आंबा बागायतदार, काजू बागायतदार, काजू कारखानदार व कॅनिंग खरेदीदार यांची बैठक वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. यावेळी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, वेंगुर्ले मुख्याधिकारी वैभव साबळे, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपीन वरसकर, खजिनदार श्रीकृष्ण झांटये, दीपक ठाकुर, उमेश येरम, आंबा बागायतदार नितीन कुबल, जयप्रकाश चमणकर, विलास ठाकुर, नगरसेविका पूनम जाधव तसेच राजू पांगम, जनार्दन पडवळ आदी उपस्थित होते.

काजू बीचा दर हा मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतो. सद्यस्थितीत कुठेही मागणी नसताना किंवा पुढील चार महिन्यात मागणीत वाढ होण्याचा कोणताही आधार नसताना काजू बीचा दर निश्चित करणे कठीण आहे. जागतिक बाजारपेठेत काजू बी खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काजूगराची मागणी फारच कमी आहे. महाराष्ट्रात दोन लाख 50 हजार मॅट्रीक टन एवढा काजू तयार होतो. शासनाने उद्योगाला परतावा योजना दिल्यामुळे काजू बीचे दर वाढत गेले होते. आज काजू बी व काजूगरावर टॅक्स लागल्यामुळे व परतावा योजना बंद झाल्यामुळे उद्योगाला अतिरिक्त कोणताही फायदा नसल्यामुळे काजूगराच्या मागणीप्रमाणे काजू बीचे दर राहतात. त्यामुळे काजू कारखानदार दोडामार्ग ते बांदा 100 रुपये, सावंतवाडी 95 रुपये, कुडाळ-कणकवली 90 रुपये व अन्य ठिकाणी प्रतवारीप्रमाणे 80 ते 85 दरांने काजू व्यापाऱयाकडून काजू खरेदी करतात. हेच दर कारखानदारांना सद्यस्थितीत परवडतात. काजूगराला मागणी वाढल्यास दर वाढवू शकतो, असे यावेळी सुरेश बोवलेकर यांनी काजू कारखानदारांच्यावतीने सांगितले. तर काजू बागायतदार विलास ठाकुर, जयप्रकाश चमणकर यांनीही काजू बागायतदारांना काजू उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता आपल्याकडील काजू बी काजू व्यापाऱयांना 70-80 दराने देणे परवडत नसल्याने ती 100 ते 120 रुपये दराने खरेदी करण्यात यावी, अशी मागणी केली. काजू कारखानदार व काजू बागायतदार यांच्यामध्ये काजू दराबाबत सुवर्णमध्य न निघाल्याने तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सद्यस्थितीत ज्यांना हे दर परवडतात त्यांनी विक्री करावी. इतरांनी काजू दर वाढल्यानंतर आपल्या काजू बीची विक्री करावी, असे सांगितले.

या बैठकीस आंबा कॅनिंग खरेदीदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कोणीही कॅनिंग खरेदीदार उपस्थित न राहिल्याने आंबा कॅनिंगचा दर निश्चित झाला नाही. मात्र, यावेळी उपस्थित आंबा बागायतदारांनी आंबा कॅनिंगला 50 रुपये दर मिळावी, अशी मागणी केली. कृषी मालाच्या वाहतुकीसंदर्भात काही अडचणी आल्यास 18001804200, 18001814488 या टोल फ्री नंबरवर किंवा 9423090301 वर संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -