कळणे येथील मायनिंगवर घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

0
101

सिंधुदुर्ग – दोडामार्ग-कळणे येथील खाणीवरील गुरुवारच्या घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या पर्यावरण सचिव मनिषा म्हैसेकर यांना दिले आहेत.

वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र दिले होते,त्याची तात्काळ दखल घेत ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुरुवारी कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचुन खाणीतील पाणी व चिखली युक्त माती परिसरातील शेती व लोकवस्तीत आली.यामुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे.

अवैध तसेच मायनिंग क्षेत्राबाहेरील उत्खनन यासाठी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.यापार्श्वभूमीवर वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले.

कळणे येथे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत. तेथे खाणकाम सुरू आहे. दोडामार्ग मधिल ही खाण अंक्षी दांडेली / भीमगडला राधानगिरी अभयारण्यला जोडणाऱ्या पश्चिम घाटाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरच्या मध्यभागी आहे.

पाण्याच्या पातळीस धोका निर्माण झाल्यावरही हजारो झाडे तोडली गेली आणि खाणकाम केले गेले.

आम्ही या बेकायदेशीरपणाची माहिती देत ३० मे २०२० च्या आमच्या ईमेलद्वारे खाणीला काम करण्यास संमती देण्यास आक्षेप घेतला होता.मात्र आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.

आज केवळ जंगलेच नष्ट झाली नाहीत तर लोकांच्या जीवनावरही परिणाम झाला आहे. हजारो टन गाळ कळणे येथील ग्रामस्थांच्या घरात शिरला आहे आणि काळणे नदी सुद्धा प्रदूषित आहे.

असे स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही.

या कॉरिडॉर मध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड व अवैध उत्खननामुळे डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत.

कळणे व गाळेल येथे अश्याच घटना घडल्या. त्यामुळे हा कॉरिडॉर संरक्षितत करण्यासाठी पाऊले उचलून कळणे येथील घटनेची चौकशी करण्याची मागणी दयानंद यांनी केली होती.

यांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत पर्यावरण सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच या घटनेची माहीती मुंबई उच्च न्यायालयासही दिली जाणार असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here