कणकवलीत भरदिवसा रुग्णवाहिका चालकावर चॉपरने हल्ला

0
123

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली शहरात बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चॉपरने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

चॉपरने वार करण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रसंगावधान राखल्याने यात उत्तम पुजारे हे बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. कणकवली पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

घटनेनंतर तेथील लोकांनी आरडाओरडा केल्याने संशयित आरोपीने पलायन केले. तसेच जखमी उत्तम यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलिस स्टेशनमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. उत्तम पुजारे हे बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेचे चालक म्हणून काम करतात.

हरकुळ बुद्रुक येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हरकुळ बुद्रुक येथील धवन नामक संशयित आरोपीने पुजारे यांच्या घराजवळ जात आज दुपारच्या सुमारास चॉपरने हल्ला केला. मात्र सुदैवाने या हल्ल्यात पुजारे हे बालंबाल बचावले.

पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भरदिवसा कणकवली शहरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here