कणकवलीची घटना सतीश सावंत यांनीच घडविली भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांचा सनसनाटी पलटवार

0
126

 

सिंधुदुर्ग – कणकवलीत घडलेली मारहाणीची घटना ही सतीश सावंत यांच्या विकृत मनोवृत्तीचे कारस्थान आहे, असा सनसनाटी पलटवार माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केला. सतीश सावंत यांचा पीए, ड्रॉयव्हर आणि जिल्हा बँकेचे लँड लाईन डिटेल्स पोलिसांनी जाहीर करावेत, मग सत्य बाहेर येईल, असे राणे म्हणाले.

सतीश सावंत हा अत्यंत कारस्थानी माणूस आहे. कारस्थाने घडवून आणायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा त्यांचा धंदा आम्हाला माहिती आहे. कणकवलीची घटना हे त्यांचेच कारस्थान आहे. हे कारस्थान कसे घडले, कुठे घडले, कोणी घडवले याची माहिती घेण्यासाठी सतीश सावंत, त्यांचे स्वीय सहायक, जिल्हा बँकेची लँड लाईन यांचे तपशील पोलिसांनी तपासावेत, असे निलेश राणे यांनी सांगितले.

निवडणूक तोंडावर आली म्हणून हे असले प्रकार घडवले जात आहेत. आणि ते घडवणारा माणूस सतीश सावंतच आहे. असले काहीतरी उद्योग करायचे आणि खापर राणेंच्या नावावर फोडायचे, असा हा डाव आहे. गेल्या सात वर्षात शिवसेनेची सत्ता आहे. दीपक केसरकर गृहराज्यमंत्री होते.आज ठाकरे सरकार सत्तेत आहे तेव्हा राणेंच्या विरोधात एकसुद्धा केस का सापडली नाही ? सात वर्षात एकही वादग्रस्त घटना का घडली नाही ? असे सवाल निलेश राणे यांनी केले.

घडलेल्या घटनेसंदर्भात आम्ही योग्य तो कायदेशीर क्रम घेऊ. आमचे वकील न्यायालयात या प्रकरणाची चिरफाड करतीलच, पोलिसांनीही आपले काम जबाबदारीने करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here