आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आचरा खाडीपत्रात कांदळवन रोपांची लागवड

0
122

 

कणकवली – आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने सागर संवाद यात्रे अंतर्गत आचरा खाडी पात्रात कांदळवन रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

याप्रसंगी कुडाळचे वनक्षेत्रपाल सं. श्री. कुंभार, कडावलचे वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वनपाल श्रीकृष्ण परिठ, आम आदमी पक्षाच्या लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप वंजारे, आदित्य बटवाले, मिली मिश्रा, राजाराम शेटये, संदेश सावंत, संतोष बागवे, संतोष चिंदरकर, अभि गावडे आदी उपस्थित होते.

आचरा खाडीमध्ये कांदळवन सफारी घडवणारे आणि कांदळ वनांच्या संवर्धनासाठी काम करणारे प्रमोद वाडेकर काका यांचा यावेळी आचरा खाडीमध्ये सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्या हस्ते शाल पांघरून सत्कार करण्यात आला. प्रमोद वाडेकर यांनी आपल्या परसबागेत कांदळवणाच्या दुर्मिळ प्रजातींची लागवड केली आहे. विविध विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या या परसबागेत येऊन प्रजातींचा अभ्यास करतात. या परसबागेची देखील वनविभागाच्या उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

यावेळी बोलताना सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड म्हणाले की, कांदळ वनांचे खरे महत्व त्सुनामीच्या काळात समजले. ज्या भागात कांदळवणे आहेत त्या भागातील लोकवस्तीचे संरक्षण अनेक वादळांमध्ये कांदळ वनांनी केले आहे. मुबलक ऑक्सिजनचा पुरवठा आणि विविध पक्षांच्या रहिवासाचे ठिकाण म्हणून कांदळ वनांची ओळख आहे. माशांच्या प्रजोत्पादनात कांदळ वने मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे या वनांची जपणूक केली पाहिजे आणि याकरता सिंधुदुर्ग जिल्हा वनविभाग कायम प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यावेळी म्हणाले की, समुद्रामध्ये मत्स्य दुष्काळ वाढत असताना आता खाडीपात्रामध्ये पर्यायी उपजीविकेची साधने निर्माण केली पाहिजेत. कांदळ वनांच्या माध्यमातून उपजीविकेचे विविध पर्याय आता सर्वांसमोर उपलब्ध होत आहेत, त्यामुळे ही वने तोडण्यापेक्षा त्याचा किनारी भागातील लोक आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतात. त्यामुळे ही वने जपण्यासाठी मोहीम राबवतानाच या वनांच्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार आणि विविध संधी याबाबत आगामी काळात प्रबोधनाची चळवळ राबवणार असल्याचे ते म्हणाले.

प्रमोद वाडेकर यांनी यावेळी कांदळ वनांच्या विविध जातींबाबत आणि या वनांमध्ये आश्रय घेणारे पक्षी व विविध प्राणी याबाबतची माहिती दिली. यावेळी शेकडो रोपांची खाडीपत्रात लागवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here