सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आतापर्यंत हिवतापचे 2 तर डेंगीचे 20 रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागाकडून देण्यात आली आहे. आधी कोरोना आणि आता पावसाळा सुरु झाला आणि जिल्ह्यात डेंगीने डोके वर काढले आहे. मागच्या वर्षी डेंगीचे 124 रुग्ण व हिवतापाचे 38 रुग्ण आढळले होते. त्यात हिवतापाने एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता. ही बाब लक्षात घेता खबरदारीच्या उपाय योजनेसाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या आजाराचा प्रामुख्याने समावेश होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्या समन्वयाने या कार्यक्रमाची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार पावसाळ्याचा हंगाम हा किटकजन्य आजारासाठी जोखमीचा असल्याने जून हा संपूर्ण महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून सध्या जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. कोणताही ताप हा हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया असू शकतो हे लक्षात घेऊन ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात रक्त तपासून घ्यावे. आरोग्य यंत्रणेकडून दिलेले निर्देश आणि सूचनांचे पालन करून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन हिवताप विभागामार्फत करण्यात आले आहे.