सिंधुदुर्ग – उमेद ग्रामीण जीवोन्नती अभियानाचे खासगीकरण करू नये आणि करार संपलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्ठात आणू नये या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील बचत गटाच्या लाखो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. शासनाने या मोर्चेकरी महिलांना बोलण्यात गुंडाळून अखेर आपला हेतू सध्या केला आहे. उमेद अभियान थर्ड पार्टी कंपंनीला चालवायला दिले असून तसे सूतोवाच राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केले आहे.
सध्या राज्यात गाजत असलेल्या ‘उमेद’ अभियान खाजगी कंपनीच्या हातात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यावर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी शिक्कामोर्तब केले असून, ‘उमेद’ ची शंभर कोटीची बँक उभी करणार असल्याचे सुतोवाचही मंत्री सत्तार यांनी केले आहे. आंबोलीहून सावंतवाडीकडे येत असताना माडखोल येथील शाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान म्हणजेच उमेदकडून आयोजित केलेल्या प्रदर्शनाला मंत्री सत्तार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण बचत गटाची पाहणी केली. तसेच वेगवेगळ्या वस्तूही विकत घेत महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूचे तोंड भरून कौतुक केले.
बचत गटांच्या महिलांनी उमेद अभियान सुरू ठेवा तसेच उमेदच्या कर्मचाऱ्यांना काढू नका अशा वेगवेगळ्या मागण्या यावेळी केल्या. यावर मंत्री सत्तार यांनी तुम्ही उमेद अभियान खाजगी कंपनीच्या ताब्यात देउ नका हे कशासाठी सांगता असा सवाल केला. त्यावर महिला गप्प बसल्या. तुम्ही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कमी करणार, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही सांंगितले असल्याचे महिलांनी सांगताच कर्मचाऱ्यांचे तुम्ही बघू नका बचत गटांच्या मालाला जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल, तुमचा माल बाहेर कसा विक्री होईल हे बघा, बचत गटांना कुठेही धोका उद्भवणार नाही यांची खात्री आम्ही देतो. मात्र आता उमेद अभियान खाजगी कंपनीच्या ताब्यात गेले आहे. त्याला आम्ही काहि करू शकत नाही. यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेउ शकतात, असेही मंत्री सत्तार म्हणाले. उमेदची शंभर कोटींची बँक उभी करण्यात येणार असून, त्यातून सर्व कारभार चालणार आहे. बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.