सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण, मृताच्या नातेवाईकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष

0
140

 

सिंधुदुर्ग – तपासणीत हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रकार घडला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून डॉक्टरांनी पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, डॉ. लिहितकर यांनी याबाबतची रितसर तक्रार ओरोस पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी मृत स्मिता भोसले यांचा मुलगा व अन्य तीन नातेवाईक यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱयाला शिवीगाळ व मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील स्मिता शिवाजी भोसले या ३१ जुलै पासून जिल्हा रुग्णालयात दाखल होत्या. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे नॉन कोविड कक्षात त्यांच्यावर त्यांना पूर्वीपासूनच त्रास जाणवत असलेल्या आजारावर उपचार सुरू होते.

डॉ. सौरभ लिहितकर हे अपघात विभागात कर्तव्यावर होते. त्या रात्री स्मिता भोसले यांची प्रकृती बिघडली. उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच कर्तव्यावर असलेल्या डॉ. लिहितकर यांना स्मिता यांच्यावर उपचार करणारे डॉ. पवार समोर का येत नाहीत, असा सवाल करत शिवीगाळ व मारहाण केली. त्याचप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची तक्रार देण्यात आली आहे.‘कोविड’च्या काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी संख्या असतानाही चांगली सेवा देत असणाऱ्या डॉक्टरांनी एकत्र येत या मारहाण व धमकी प्रकरणाबाबत आवाज उठविला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या काचाही फुटल्या आहेत. त्यामुळे सदर प्रकरण फार गंभीर असल्याकडे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यावर असणाऱया डॉक्टरांच्या संरक्षणासाठी पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. पोलिसातही याबाबत तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here