कणकवली – तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश कार्यक्रम कलमठ येथे पार पडला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, प्रदेश सरचिटणीस सरफराज नाईक, व्यापारी सेल महिला जिल्हाध्यक्ष चित्रा देसाई, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, उपाध्यक्ष मंगेश दळवी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शफीक खान, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेल सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष हिदायत तुल्ला खान, युवक तालुकाध्यक्ष कणकवली सागर वारंग, जयेश परब, सतीश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले कणकवलीत लोकांनी अनेक वर्षे राणेंच्या सोबत संघर्ष केला आहे. या संघर्षाच्या बळावर अनेक पक्ष उभे राहत असतील मात्र या संघर्षाचे मूळ राष्ट्रवादीत आहे. आज भाजपा आणि अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर विश्वास ठेवून पक्षात दाखल होत आहेत. त्यांचा योग्य सन्मान केला जात आहे. आज राज्यातील अनेक महत्वाची मंत्रीपदे राष्ट्रवादीकडे आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील विकासाला गती दिली जात आहे. असे ते म्हणाले. तसेच फोंडा येथील लोकांच्या पैशाची खासगी कंपनीत गुंतवणूक करून घेऊन फसवणूक झालेली आहे त्यानाराष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देताना त्यांचे पैसे परत मिळवून देणारा अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर राज्यातील दर महिन्याने एक मंत्री जिल्ह्यात येणार असून येथील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकांची कामे घ्यावीत आणि आमच्याकडे द्यावीत पक्षाच्या मंत्र्यांकडून लवकरच त्यावर योग्य तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले
पक्षाचे प्रदेश संघटक काका कुडाळकर बोलताना म्हणाले केंद्रातल्या सत्तेच्या जोरावर भाजपा पुढे जात असेल, राज्यातल्या सत्तेच्या जोरावर सेना पुढे जात असेल तर आपली स्थिती काय? हा प्रश्न समोर असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्यातल्या सत्तेचा केंद्रबिंदु हा राष्ट्रवादी पक्ष आहे. शरद पवार यांच्या दृष्टीकोनातून आणि विचारातून हे सरकार चालत आहे. फक्त याकडे आपण पाहत नाही. या जिल्ह्यात त्याकडे पाहण्याची गरज आहे. येथील सत्तेतही आपली भूमिका तशीच असावी असे ते म्हणाले. शरद पवार यांनी या जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. फलोत्पादन अभियानांतर्गत या जिल्ह्यात शरद पवार यांनी क्रांती घडविली आहे. या जिल्ह्याच्या पर्यटन विकासात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. आणि म्हणूनच आपलीही जबाबदारी वाढत आहे. पक्षाची ध्येय धोरण लोकांमध्ये पोचवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कणकवलीतील प्रसिध्द विधितज्ञ ऍड. प्राजक्ता शिंदे, कलमठ येथील अन्वरसुमार साठी, प्रिन्सिपॉल अनिता फर्नांडिस, साक्षी तर्फे, राजश्री शिंदे ,सुरेखा सावंत, गायत्री शिंदे , रामचंद्र तर्फे, समृद्धी तर्फे, संदीप बोबाटे, प्रवीण कदम ,अर्चना विश्वेकर ,सारिका सावंत, मनीषा सावंत, ज्योती साटम आदींनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.