रांगणा गड इथे राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता

0
384

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या आणि अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंची अवस्था डळमळीत झालेली आहे. इतिहासाचे हे मूक साक्षीदार इतिहासजमा होत आहेत. पर्यटन विकासाच्या धर्तीवर इतिहासाच्या खाणाखुणा जपण्यासाठी तुमच्या-आमच्यातील मावळ्यांनीच पुढे येऊन जबाबदारी उचलण्याची गरज आहे.

पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. या दोघांच्या मध्ये कोकण प्रदेश वसला आहे. या प्रदेशात फिरताना निसर्गसौंदर्य तर डोळ्याला भावतेच, त्याशिवाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमलेला व अरबी समुद्राच्या लाटा-लाटांवर उसळणारा इतिहास साद घालतो. तो केवळ इथले गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट यांच्या अस्तित्वामुळेच. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर १४ गिरिदुर्ग पाहायला मिळतात. आपल्या देशात आपलेच राज्य असावे, या हेतूने प्रेरित होत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे सरसावले. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील उंच उंच शिखरांवर गिरिदुर्ग म्हणजे मुके मावळेच उभे केले. काही गिरिदुर्ग जिंकून घेतले. त्यापैकी एक असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा आहे.

कुडाळ तालुक्यातील नारूर मुक्कामाहून रांगणागडावर जायला पायवाट आहे. भयाण जंगल, दगडधोंडय़ांतील पायवाट, जंगली पशूंचा वावर या संकटांवर मात करत रांगणागड गाठावा लागतो. वाटेत जर लक्ष चुकून तुमचा पाय घसरल्यास १०० ते १५० फूट तुम्ही खालीच गेला समजा.. या गडावर जायचं म्हणजे दांडगी इच्छाशक्तीच हवी. तब्बल २ तासांनंतर गडावर पोहोचता

येते. गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. जुना दिंडी दरवाजादेखील अर्धवट उभा आहे. दिंडी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते. थोडंसं पुढे चालत गेल्यावर दुसरा एक दरवाजा लागतो. या दरवाजाचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. दरवाजातून पुढे गेल्यानंतर मोठा तलाव पाहायला मिळतो. या तलावात वर्षांचे बाराही महिने मुबलक पाणी असते. तलावाच्याच काठावर पश्चिमेला भग्नावस्थेतील शंकर मंदिर आहे, तर थोडंसं पुढे रांगणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरील नक्षीदार दीपमाळ लक्ष वेधून घेते. या दीपमाळेचे बांधकाम काळ्या दगडाचे आहे. मंदिर छोटेसेच आहे; परंतु वादळात मंदिराची इमारत केव्हाही पडेल, अशी अवस्था या वास्तूची झालेली आहे. या मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिरदेखील आहे.

रांगणागड भेटीच्या निमित्ताने या गडावर एक दिवस वास्तव्य करण्याचा योग आला. संपूर्ण गडावर फिरताना या गडाच्या चारही बाजूला पाहिल्यास नजरेत मावणार नाही एवढा दूरवरचा प्रदेश दिसतो. या गडाचा नेमका इतिहास काय याचा शोध घेता घेता संदर्भ ग्रंथांमधून जी माहिती समोर आली ती रोमांचित करणारी होती.

हा गड शिलाहार घराण्यातील दुसरा भोज राजाने उभारला आहे. इ. स. ११७५ ते १२१२ हा या राजाचा कालावधी आहे. यावरून हा गड ८०० वर्षांहूनही अधिक काळापूर्वीचा आहे, हे लक्षात येते. शिलाहारांची पन्हाळा ही राजधानी होती. राजा दुसरा भोजने आपल्या कारकीर्दीत १५ किल्ले उभारले. त्यापैकी रांगणागड हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेऊन स्वराज्यात सामील केला. प्रतापगडावर १० नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. यानंतर १८ दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ रोजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला. पुढे पावणगड, वसंतगड व विशालगडाबरोबरच रांगणागडही जिंकून घेतला. १६९५ मध्ये रांगणागडावर राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता.

९ डिसेंबर, १८४४ साली हा गड इंग्रजांनी ताब्यात घेतला. अत्याधुनिक तोफांच्या माऱ्यात गडावरील इमारती व तटबंदीचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरच्या पन्हाळगडापासून हा किल्ला ५० मैलांवर आहे, तर समुद्र सपाटीपासूनची याची उंची ३००० फूट आहे. माणगाव खोऱ्यात आणखी दोन गिरीदुर्ग आहेत. या दुर्गाच्या जतनासाठी येथील एक सामाजिक कार्यकर्ते विजय पालकर प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की, सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकाला आमच्या पूर्वजांचा इतिहास आम्ही दाखवू शकलो परंतु, त्याच इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणजे गडकिल्ले इतिहासजमा होत आहेत. इतिहास आपण पुस्तकातून वाचतो, परंतु तो अवशेष रूपाने जपला तर पुढील पिढीला दाखवता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवत स्वराज्य उभे केले. धर्मनिरपेक्ष राज्य करत खऱ्या लोकशाहीची संकल्पना त्यांनी मांडली. महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा चेहरा दिला. त्यांच्या नावावर अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली, परंतु महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या वास्तू टिकविण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.

मध्यंतरी राजस्थानमधील ऐतिहासिक पर्यटन पाहण्याचा योग आला. राजस्थानच्या धर्तीवर सिंधुदुर्गमधील ऐतिहासिक पर्यटन विकसित केल्यास पर्यटनातून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. या माध्यमातून महाराजांचं विज्ञाननिष्ठ बुद्धिचातुर्य आदी अनेक पैलू पुढील पिढीसमोर ठेवता येतील. आणि म्हणूनच स्वराज्याच्या खाणाखुणा जपण्यासाठी तुमच्या-आमच्यातील मावळ्यांनीच पुढे येऊन जबाबदारी उचलण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here