मुंबईलगत डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंप

0
105

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील काही गावांत गेल्या ११ महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याने आदिवासी भागातील ग्रामस्थ राहती घरे सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. शनिवारी पहाटे ४.५ वाजता भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. या नैसर्गिक संकटाची दखल घेण्यास सरकारी यंत्रणा अद्याप तयार नसल्यामुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. भूकंपाच्या या हादऱ्यांनी घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून काही घरे खचली आहेत. कोणत्याही क्षणी भूकंप होईल, या भीतीने ग्रामस्थ दिवस काढत आहेत. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता डहाणू तालुक्याच्या पूर्वेकडील भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर वर्षभरात डहाणू व तलासरी या दोन्ही तालुक्यांत भूकंपाचे धक्के बसत आहेत. १ फेब्रुवारी रोजी दुपारी २.६ वाजता आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला. त्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल अशी होती. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपांची ही मालिका खंडित झाली होती, मात्र ऐन दिवाळीत शनिवारी पहाटे ४.०५ वाजता भूकंपाची सौम्य तीन धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता २.७ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here