कोरोनामुळे कोकणातील हापूसची उलाढाल संकटात

0
254

 

आधीच उत्पादन 35 टक्यांवर त्यात बागायतदारांवर कर्जाची टांगती तलवार

कोरोना’ने सारे जनजीवन प्रभावित झालेले असताना कोकणातील हापूस आंबा बागायतदारही पुरता हवालदिल झालेला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या सुमारे दीड लाख टन हापूस आंब्यातून 800 कोटींची उलाढाल होते. यंदा वातावरणाच्या परिणामामुळे आधीच 35 टक्यांवर हापूस उत्पादन आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान देशातून होणारी विमानसेवा बंद झाली असून राज्यांच्या सीमा देखील सील केल्या जात आहेत. फळमार्केटची स्थितीही बंदसारखीच असल्याने त्याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. आताच आंबा निर्यातीला प्रारंभ झाला असताना ‘कोरोना’ संकटामुळे तयार होऊ घातलेल्या हापूसचे करायचे काय? अशा मोठय़ा विवंचनेत बागायतदार पडले आहेत. कोकणातील सिंधुदुर्गात 30 हजार हेक्टर तर रत्नागिरी जिल्ह्यात 65 हजार हेक्टर क्षेत्रात हापूस लागवड आहे. याठिकाणी तयार होणारा हापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) नवी मुंबई त्या खालोखाल पुणे व कोल्हापूर येथील एपीएमसीवर सर्वस्वी अवलंबून राहावे लागते. याबरोबरच देशांतर्गत मंडईत, परदेशी निर्यात, पॅनिंग, स्थानिक मंडईत किरकोळ विक्री आदी माध्यमाने आपल्या मालाची विक्री करते. यावर्षी हवामान बदलाचा मोठा फटका आंब्याला बसला. हवामान बदलामुळे वादळे, थंडी लांबणे, अवेळी पाऊस, दोनवेळा आलेला मोहर, परिणाम तुडतुडा, भुरी रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, पहिल्या उत्पादनावर होणारा परिणाम अशाप्रकारे आंबा उत्पादनावर यावर्षी मोठा परिणाम जाणवत आहेत.

येथील आंब्याला देशांतर्गत बाजारपेठांबरोबरच आाखाती देश, युरोप, अमेरिका आदी ठिकाणी हापूसची मोठी बाजारपेठ आहे. दरम्यान गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने आंबा काढणी व निर्यातीला मूहूर्त साधला जातो. मात्र आताची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर बनली आहे. मार्केटमधील  व्यापारीही 31 मार्चनंतरच आंबा पाठवा असे सांगत आहेत. बाजार समित्यामध्ये माल उतरवण्यासाठी हमालवर्ग देखील उपलब्ध नाही. किटकनाशके, फवारणी, कामगार, ते विक्री अशा साऱ्यांचा विचार करता होणारे अगणित नुकसान कसे भरून काढणार? अशी मोठी चिंता बागायतदारांसमोर उभी आहे.

तर बागायतदार कर्जाच्या खाईत लोटला जाईल – माजी आमदार अजित गोगटे

यावर्षी वातावरणाच्या परिणामामुळे हापूस गतवर्षीच्या तुलनेत फक्त 35 टक्के आहे. म्हणजे कोकणातील दोन्ही जिल्ह्यात साधारणतः 55 हजार टन हापूस येईल. त्यातून दरवर्षी होणारी सरासरी 800 कोटींची उलाढाल लक्षात घेता या वर्षी साधारण 280 कोटींचा हापूस आला आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हापूस वाहतुकीला परवानगी असली तरी सर्व मार्केट बंद असल्याने आंबा उतरवायचा कुठे हा प्रश्न आहे.  31 मार्च पर्यन्त मार्केट सुरू झालं तर पुढचा येणारा माल जाऊ शकेल नाहीतर तोही माल पडून राहील आणि बागायतदार कर्जाच्या खाईत लोटले जातील. अशी प्रतिक्रिया देवगडमधील हापूस बागायदार, निर्यातदार व माजी आमदार अजित गोगटे यांनी दिली आहे. हापूस बागायती ही मोठी गुंतवणूक आहे. औषधांचे दर सामान्य बागायतदाराला परवडणारे नाहीत म्हणून बागायतदार स्थानिक बँकांकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय करतात तसेच हा व्यवसाय दलालांच्या मेहरबानीवर आणि व्यापाऱ्यांच्या उसनवारीवर चालतो. यंदा व्यापाऱ्यांची उसनी देणीही कशी भागवायची हा प्रश्न आहे असे अजित गोगटे पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here