कोरोना प्रादुर्भावामुळे संचारबंदी असल्याचा फायदा घेत स्वत:च्या बागायतीत बंदुकीने दोन शेकरुंची शिकार केल्याप्रकरणी लीलाधर मीनानाथ वराडकर (25, रा. कुणकेरी-वाघबीळ) याला वन्यप्राणी हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून वनविभागाने अटक केली. त्याला सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लीलाधर हा भारतीय सैन्यात सेवेत असून तो सुट्टीवर गावी आला होता. त्याने शिकार केल्यानंतर मृत शेकरुंसोबतची सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला.
लीलाधर पाच वर्षांपर्वी सैन्यदलात भरती झाला होता. 2 मार्चला तो जम्मू काश्मिर येथून कुणकेरी गावी महिन्याच्या सुट्टीवर आला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर तो पश्चिम बंगाल येथे युनिटसोबत जाणार होता. मराठा इन्फंट्री बटालियन जम्मू काश्मिर येथून पश्चिम बंगाल येथे जाणार असल्याने त्याला सुट्टीवर पाठविण्यात आले होते. महिन्याची सुट्टी संपवून तो युनिटला हजर होणार होता.
शिकारीची घटना 3 एप्रिलला त्याच्या घरापासून काही अंतरावर वाघबीळ जंगलात घडली. तेथे त्यांची काजू बागायती आहे. तेथेच शेती संरक्षणार्थ घरात असलेल्या बंदुकीच्या सहाय्याने त्याने दोन शेकरुंची शिकार केली. त्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढत ती व्हॉट्सऍपवर व्हायरल केली.
वन्यप्राणी मित्रामुळे शिकार उघडकीस
वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य तथ मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे यांना या शिकारीची माहिती मिळाली. त्यांना 10 एप्रिलला रात्री उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर कारवाईची हालचाल होत फोटोची खातरजमा करून कुणकेरी गावात जाऊन लीलाधर वराडकरला अटक केली.
आठ दिवसानंतर शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक ईस्माईल जळगावकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टी, वनकर्मचारी पेडणेकर यांनी लीलाधर याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.त्याला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. वनखात्याने लीलाधर कार्यरत असलेल्या संबंधित युनिटला कळविल्यानंतरच त्याला अटक करण्यात आली. ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर सध्या न्यायालयीन कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होते. या प्रकरणातही तशीच सुनावणी घेण्यात आली.
सैन्य दलातील भावाच्या नावावर बंदूक
लीलाधर याचा मोठा भाऊ सैन्यदलात आहे. त्याने स्वरंक्षणासाठी बंदूक परवाना घेतला होता. या शिकारीसाठी वापरलेली बंदूक भावाच्या नावे आहे. या शिकारीत अन्य कोण साथीदार आहेत का? या मृत शेकरुंची विल्हेवाट कोठे लावली, याचा तपास केला जाणार आहे, असे वनाधिकारी पाणपट्टी यांनी स्पष्ट केले.
कुटुंबियांना धक्का
शनिवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने लीलाधर याच्या घरी जाऊन चौकशी केली. चौकशीअंती लीलाधर याला ताब्यात घेताच त्याचे वडील व कुटुंबियांना धक्का बसला. वडिलांना अश्रू अनावर झाले. लीलाधरने आपणच शिकार केल्याची कबुली दिली आहे.
शेकरू वन्यप्राणी शेडय़ूल दोनमध्ये
शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्याला झाडांवर राहणारी खारुताई असेही म्हटले जाते. सदाहरित, निम सदाहरित व नदीकाठच्या जंगलात तो आढळतो. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रानबिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर इ. झाडांवर शेकरू राहते. याच फळांचे अन्न म्हणून उपयोग करते. उंच झाडांवर घरटे बांधतो. शेकरुचे जीवनचक्र साधारण 15 वर्षांचे असते. शेकरुची मादी तीन वर्षात तर नर पाच वर्षात वयात येतो. शेकरू एकावेळेस एक-दोन पिल्लांना जन्म देते. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम नुसार शेकरू शेडय़ूल दोनमध्ये समाविष्ट आहे. सावंतवाडीपासून दहा कि. मी. अंतरावर कुणकेरी गाव आहे. या गावातील जंगलात विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. या जंगलात पाच-सहा महिन्यापूर्वी खवले माजरांची शिकार करण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे गावीच अडकला
लीलाधर हा 2 मार्चला गावी आला होता. एक महिन्याच्या सुट्टीनंतर तो पुन्हा युनिटला जाणार होता. मात्र, लॉकडाऊन झाल्याने तो गावीच अडकून पडला. आणि याच काळात त्याने शिकार केल्याने तो अडचणीत आला. लॉकडाऊन नसते तर तो वेळीच सेवेत जाणार होता.