हायब्रीड मिरचीचा सेंद्रिय प्रयोग

0
237

 

कोंकण – शेती व्यवसायात उत्पन्न कमी मिळत असल्याचे सांगत अनेकजण या व्यवसायकडे पाठ फिरवतात. मात्र अलिबाग तालुक्यातील नागझरी येथील तरुण प्रगतशील शेतकरी सचिन बैकर यांनी शेती व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे दाखवून दिले आहे. आपल्या बारा एकर जागेत अडीच गुंठा शेतजमिनीवर हायब्रीड सेंद्रिय पद्धतीची मिरची लागवड करून प्रयोग यशस्वी केला आहे. आतापर्यत सचिन यांनी 300 किलो मिरची उत्पादन घेतले आहे. सचिन यांच्या या सेंद्रिय शेतीला यश आले आहे. त्यांची हि कामगिरी सर्वांसाठी आदर्शवत ठरत आहे.

पुणे येथे एका कंपनीत उच्च पदावर, भरमसाठ पगाराची नोकरी असतानाही ती सोडून सचिन बैकर हे आता प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील पोयनाड नागझरी येथे बैकर यांची 12 एकर जमीन आहे. या शेतीकडे आधी त्यांचे दुर्लक्ष होते. मात्र गावी आल्यानंतर आपल्या जागेत काहीतरी करण्याचा विचार करत ते शेती व्यवसायाकडे वळले. आपल्या जागेत त्यांनी विविध पिके घेण्यास सुरुवात केली. कुक्कुट पालनाकडे ते वळले.

 

 

सचिन यांनी आपल्या जागेत अडीच गुंठे जागेवर हायब्रीड मिरची लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला. सचिन याला कुक्कुट पालन व्यवसायाचाही फायदा झाला. कुक्कुट पालन करताना काही पक्षी मरतात. हे मृत पक्षी, खराब अंडी, शेण, गोमूत्र आणि गूळ हे मिश्रण एका ड्रममध्ये ठेवून सेंद्रिय खत निर्माण केले. चार पाच दिवसाने मिर्चीच्या बनविलेल्या वाफ्याना पाटाच्या पाण्याद्वारे ही सरी सोडली जाते. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने मिरची लागवड केली त्यामुळे हिरवीगार मिरची उत्पादन मिळू लागले.

मिरचीला कीड लागू नये यासाठी त्यामध्ये जोडीला झेंडू फुलांची लागवड केली आहे. त्यामुळे मिर्चीवर येणारी कीड ही फुलात बसल्याने मिरचीचा किडीपासून बचाव झाला आहे. विशेष म्हणजे मिरची आठ दिवस बाहेर ठेवली तरी सुकत नाही, वजनात घटही होत नाही. आतापर्यत सचिन यांनी तीन वेळा मिरचीची काढणी केली असून 300 किलो उत्पादन मिळाले आहे. एका झाडाला अर्धा किलो मिरची लागत आहे.

सचिन बैकर या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचा केलेला प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. त्यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी शेताला भेट देत आहेत. सचिन बैकर यांच्या या प्रयोगामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा नवा अध्याय सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here