सिंधुदुर्ग जिल्ह्याला 24 तास वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा ! आमदार नितेश राणे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी खारेपाटण येथील महापारेषण उपकेंद्र दुरुस्तीसाठी निधी द्या

0
145

सिंधुदुर्ग – जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा अशी मागणी कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर खारेपाटण येथील महापारेषण उपकेंद्र दुरुस्तीसाठी निधीची देखील त्यांनी मागणी केली आहे.

आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून हि मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाला कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील २२०/१३२ के.व्ही . तसेच सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील २२०/१३२ के . व्ही . च्या अति उच्चदाब केंद्रातून विद्युत पुरवठा होत आहे. २२ सप्टेंबर २०२२ रोजी खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के.व्ही . वरील वीज पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे सुमारे १लाख २० हजार ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. या घटनेकडेही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयाला विद्युत पुरवठा करणाऱ्या इन्सुली व खारेपाटण या दोन अति उच्चदाब केंद्रांपैकी एखाद्या केंद्रात भविष्यात खारेपाटण सारखा बिघाड निर्माण झाल्यास दुसऱ्या केंद्रातून विद्युत पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्यास ग्राहकांची गैरसोय होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, त्याचप्रमाणे खारेपाटण येथील महापारेषाणचे विज उपकेंद्र आगीमुळे नादुरूस्त झाल्याने त्याचे दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची उपलब्धता त्वरीत करून देण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पात्राच्या माध्यमातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here