सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत गव्याची शिकार, अवशेष विविध ठिकाणी सापडले शिकाऱ्यांनी गव्याला ठार मारून मांस लंपास केल्याचे उघड

0
131

 

सिंधुदुर्ग – आंबोली कनकीची मान (तारेचा खांब) येथील झुडुपात गवारेड्याचे अवशेष सापडले आहेत. शिकाऱ्यांनी गव्याला ठार मारून मांस लंपास केल्याचे उघड होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आंबोली येथे अलिकडच्या दोन दिवसातील ही घटना असून शिकाऱ्यांनी शिर, कातडी आणि आतडे घटनास्थळीच टाकले. त्यामुळे दुर्गंधी पसरून ही घटना उघड झाली. याप्रकरणाची माहिती वनखात्याला दिल्यानंतर वन कर्मचारयांनी घटना स्थळी पाहणी केली.

आंबोली बाजारवाडी येथील पार्थ भिसे, साल्विन गोन्साल्वीस, केदार जाधव हे तिघे दुपारच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी तारेच्या खांबाजवळच्या रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना शेजारच्या झुडुपातून कुजल्याची दुर्गंधी आली. त्यांनी त्या झुडुपाजवळ जाऊन पाहिले असता गवारेड्याचे शिर एका झुडुपात तर अन्य झुडुपात गवारेड्याची कातडी, अन्य ठिकाणी आतडी, एका ठिकाणी शेपटी होती. तसेच रक्त पडल्याचे दिसत होते. त्यामुळे शिकारीची घटना दोन दिवसातील असल्याचे निष्पन्न होत आहे.

याबाबत तिघांनीही वनविभागाला माहिती दिली. आंबोली वनपाल व्ही. डी. चाळके, वनरक्षक गोरख भिंगारदिवे, पी. डी. गडेकर, अमोल पटेकर. वनमजूर बाळा गावडे, ज्ञानेश्वर गावडे, मंगेश सावंत, अशोक गावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच वरिष्ठांना माहिती दिली. घटनास्थळी पंचनामा केला.

गवारेड्याची शिकार करून त्याचे मांस शिकारी घेऊन गेल्याने मानेच्या कातडीच्या भागाचे पोस्टमार्टम करण्यासाठी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली यांना बोलावण्यात आले. डॉ. तेली यांनी घटनास्थळी येऊन गवारेड्याच्या शिल्लक राहिलेल्या भागाचा पोस्टमार्टेम अहवाल तयार केला. अधिक तपास करून अज्ञाताविरुद्ध गवारेड्याची शिकार करून मांस लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गवारेड्याची शिकार करत फक्त मांस घेऊन गेल्याने शिकारी सराईत असल्याचे बोलले जात आहे. गोवा अथवा कोल्हापूर येथील सराईत शिकाऱ्यांचे हे काम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वनविभागाने जंगलात संशयास्पद फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वन्यप्राण्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here