सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धबधबे, निसर्ग सौदर्य पहायला पर्यटक मुकणार

0
216

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर तेथील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने बंदी आणण्यात येत होती; मात्र जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्यासह 11 ठिकाणांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापाठोपाठ पावसाळी पर्यटन हंगाम कोरडा जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. विषाणू प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मांगेली, तिलारी धरण, कोनाळकट्टा, बाबा धबधबा, कुंभवडे, आंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, धामापूर तलाव, कासारटाका, सावडाव धबधबा, शिवडाव धबधबा या ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिकरित्या एकत्र येण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

आदेशांची अंमलबजावणी पोलिस प्रशासन, तालुका दंडाधिकारी, ग्रामपंचायत व इतर विभागांनी काटेकोरपणे करावयाची आहे. या आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र गुन्हा ठरणार आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

कोरोनाने शिरकाव केल्यानंतर केंद्राने 16 मार्चपासून लॉकडाउन केले. लॉकडाऊन मेपर्यंत राहिले. मे येथील पर्यटनाचा बहराचा कालावधी होता. पर्यटकच लॉकडाउन असल्याने जिल्ह्यात कोणी फिरकले नाहीत. परिणामी उन्हाळी हंगाम कोरडा गेला. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे काही कोटींचे नुकसान झाले. हा हंगाम गेल्यानंतर पावसाळी हंगाम तरी फलदायी जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु कोरोनाची दहशत कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा स्थिरावलेला आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश जारी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here