सिंधुदुर्गात मालवण तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्याची कीटक नाशक पिऊन आत्महत्तेचा प्रयत्न जिल्ह्यात एकच खळबळ

0
159

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातल्या मालवण येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सचिन वसंत गवंडे (वय- ५५, रा. भरड मालवण) यांनी कार्यालयातच कीटकनाशक प्राशन केल्याची घटना आज बुधवारी घडली. गवंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्याने ते ऑफिसमध्ये बेशुद्ध पडल्याचे पाहिले

सचिन गवंडे हे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात स्टाफची साप्ताहिक बैठक सुरू होती. मात्र सचिन गवंडे या बैठकीत सहभागी झाले नव्हते. ते कार्यालयातच एका रूम मध्ये बसून होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने ते ऑफिसमध्ये बेशुद्ध पडल्याचे पाहिले. यावेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्यांना उपचारासाठी खासगी गाडीने ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी उपचार सुरू करताना त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यालयीन पातळीवर गवंडे यांची होती चौकशी सुरू

दरम्यान, गवंडे यांच्या विरोधात कार्यालयातील दोन कनिष्ठ महिला आणि एका पुरुषाने अशा तिघांनी लेखी तक्रार केली आहे. कार्यालयातील विशाखा समितीकडे हे प्रकरण चौकशी साठी दाखल असून यामुळेच बुधवारी त्यांना बैठकीत समाविष्ट करून घेण्यात आले नव्हते. मंगळवारी या चौकशीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्यक्ष सुनावणी झाली नसली तरी गवंडे याना त्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीची आणि तक्रार सिद्ध झाल्यास होणाऱ्या कारवाईची माहिती देण्यात आली होती, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, या चौकशीमुळेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here