सिंधुदुर्गात कोट्यवधींचा काजू पडून

0
147

 

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो काजू बागायतदारांच्या घरात कोट्यवधी रूपये किंमंतीची काजू बी खरेदीविना पडून आहे. कमीत कमी १२० रूपये प्रतिकिलोला दर मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. त्यातच पावसाळा पंधरा दिवसांवर आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू बागांवर अवलंबून आहे. गेल्या दहा वर्षात कजू लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. दरवर्षी ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मागील काही वर्षात काजूला चांगला दर देखील मिळाला. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी काजू लागवडीत रस दाखविला. काजू हे एकमेव पीक सपूर्ण जिल्ह्यात घेतले जाते. १ हजार २०० ते १ हजार ५०० कोटी इतकी काजूपासून आर्थिक उलाढाल होते.

अतिवृष्टी, क्यार वादळ आणि त्यानंतर सततचे ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी काजू उत्पादनात ४० टक्के घट झाली. साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जिल्ह्यात काजू हंगामाला सुरुवात झाली. ज्यावेळी काजू हंगाम सुरू झाला त्यावेळी साधारणपणे प्रतिकिलोला १४० रूपये दर होता. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात काजला चांगला बहर येतो. हा बहर येत असतानाच कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काजू खरेदी करणे बंद केले.

याच संधीचा फायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी काजूचा दर ७० ते ७५ रूपयांवर नेऊन ठेवला. त्यामुळे बागायतदारांनी काजू विक्री केली नाही. शेतकऱ्यांनी प्रतिकिलो १२० रूपये पेक्षा कमी दराने काजूची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले. तशा स्वरूपाच्या तालुकानिहाय बैठका सुद्धा झाल्या. परंतु अद्याप काजूची विक्री होताना दिसत नाही.

प्रत्येक शेतकऱ्यांकडे १०० किलोपासून १ हजार किलोपर्यंत काजू बी शिल्लक आहे. मोठ्या बागायतदारांकडे टनांमध्ये काजू शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. प्रत्येक बागायतदारांकडे साठवणूक करून ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळी वातावरणात काजू खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जसजसा पाऊस जवळ येतोय तसतशी शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here