सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा झाला प्रवाहित !

0
358

सिंधुदुर्ग – मान्सून दाखल झाल्यापासून आतुरतेने वर्षा पर्यटनासाठी आंबोली धबधबा प्रवाहित होण्याची वाट पाहणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर आहे. गेल्या २४ तासात येथे झालेल्या दमदार पावसामुळे अखेर उशीरा का होईना पण आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पाऊस असाच दमदार राहिल्यास येत्या काही दिवसात हा धबधबा आपल्या पूर्ण क्षमतेने प्रवाहीत होणार आहे. आता आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्याने आज पासून आंबोली वर्षा पर्यटनाला अखेर सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या शनिवार, रविवार तसेच इतर सुट्ट्यांच्या दिवशी येथे पर्यटकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळणार आहे.

दरवर्षी मॉन्सून दाखल झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आंबोली Amboli Waterfall मुख्य धबधबा प्रवाहित होतो. मात्र, यंदा मॉन्सून काहीसा उशिरा दाखल झाला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे पाऊसही बरसला नाही. परिणामी हा जून महीना संपत आला तरीही आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत न झाल्याने येथील वर्षा पर्यटन हंगाम हा अद्यापही सुरू झालेला नव्हता. परंतु, शुक्रवार (ता.२३) दुपार पासून गेले २४ तास येथे दमदार पाऊस कोसळत असल्याने अखेर शनिवार पासून आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत होण्यास सुरूवात झाली. ही पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे.

पावसाचा असाच जोर राहिल्यास पुढील काही दिवसात आंबोली मुख्य धबधबा त्याच्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आहे. असे चित्र आहे. तर दरवर्षी मॉन्सूनच्या आगमणानंतर हाच आंबोली घाटातील मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्यावरच येथील वर्षा पर्यटन हंगामाला खरी सुरूवात होत असते. हे विशेष. एकदा हा धबधबा प्रवाहीत झाल्यावर दरवर्षी वर्षा पर्यटन हंगामात राज्यासह कर्नाटक, गोवा व देश – विदेशातील असंख्य पर्यटक येथे दाखल होत वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत असतात. यंदा उशीरा वर्षा पर्यटन हंगामाला सुरूवात झाली आहे. असे असले तरी यंदा येणाऱ्या शनिवार व रविवार तसेच इतर सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची येथे विक्रमी गर्दी होणार आहे.

दरम्यान, यंदा पाऊस उशीरा सुरूवात झाला असला तरीही गेल्या २४ तासातील येथील पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच हवेतील गारवा पाहाता यंदा अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. सद्या येथील डोंगरकडे, घाट मार्गासह महादेवगड पॉइंट, कावळेसाद पॉइंट व आदी परिसरातील दऱ्या ह्या हिरव्यागार शालूने जणू नटलेल्या दिसत आहेत. त्यात घनदाट धुके, खाली उतरलेले ढग हे आंबोली घाट मार्गाने प्रवास करणाऱ्यांना तसेच येथे आलेल्या पर्यटकांना अतिशय उत्साहीत करताना दिसत आहेत. सोबत टपऱ्यांवरील गरमागरम चहा, भजी, वडापाव, भाजलेली कनसे आदी चाखण्याची मज़्ज़ा काही औरच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here