सिंधुदुर्गत पाऊस थांबला, पूरस्थिती कायम 820 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले

Share This Post

कोकणात पावसाने उसंत घेतली आहे. रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परिस्थिती सामान्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात  पूरस्थिती कायम असून ठीक ठिकाणी डोंगर खचत असल्यामुळे भीतीचे सावट आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत पुरात अडकलेल्या  820 कुटुंबाना बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील शिरशींगे , झोळंबे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगर खचत आहे, त्यामुळे 180 घरांना धोका निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि बेळगावला जोडणारे महामार्ग बंद आहेत. मुंबई गोवा महामार्ग देखील बंद असून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोल डिझेल इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे. कोकण रेल्वे मार्गही गेले 4 दिवस बंद आहे.

गेले 4 दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने कोकणचे जनजीवन प्रभावित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका सावंतवाडी , दोडामार्ग , वेंगुर्ले , मालवण,देवगड या तालुक्यांना बसला. सावंतवाडी तालुक्यातील शिरशींगे येथे माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना इथल्या 100 घरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, या ठिकाणच्या डोंगराला भेगा गेल्या आहेत. तो कोसळण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तालुक्यातील असनिये कणेवाडी येथील 18 घरातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर डोंगर खचत आहे. तालुक्यातील झोळंबे याही गावात डोंगर खचत आहे येथील कुटुंबांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य जलसिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तालुक्यातील नद्यांना पूरस्थिती कायम आहे जिल्ह्यात दोडामार्ग मधील तिलारी , मालवण तालुक्यातील काळशे , सावंतवाडीतील बांदा या भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती पाण्याखाली होती. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बुधवारी दाखल झालेल्या  NDRF च्या तुकडीने 800 हुन अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणनाची यंत्रणा पूर्णतहा  कोलमडली आहे.

करूळ घाटात सातत्याने कोसळणाऱ्या दरडी व खचलेला आंबोली घाट पाहता हे दोन्ही मार्ग वाहतुकीस धोकादायक असल्याने तूर्तास या मार्गाववरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. पूरस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळा गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या काही अपवादात्मक स्वरूपात शाळा सुरू होत्या

अर्ध्याहून अधिक जिल्हा पाण्याखाली असताना प्रशासन मात्र परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी NDRF च्या टीम व्यतिरिक्त प्रशासनाने कोणतीही यंत्रणा उपलब्ध केली नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले मात्र त्यांच्या कडूनही फार काही अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. आमदार नितेश राणे पुरजन्यस्थितीतही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत असल्याचे दिसून आले या आठवड्याभरापासून नितेश राणे यांनी अद्यापही जिल्हा सोडलेला नाही. शुक्रवारी कणकवली , देवगड, खारेपाटण येथील नागरिकांसाठी त्यांनी मोफत भाजीपाला उपलब्ध करून दिला तर देवगड वासीयांसाठी 5000 लिटर दुध उपलब्ध करून दिले. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी मालवण कुडाळचा दौरा केला. त्यानंतर ते फारसे काही दिसले नाहीत. गुरुवारी जिल्ह्यात दाखल झालेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाभर फिरून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. खासदार नारायण राणे आज शुक्रवारी जिल्यात दाखल झाले आहेत. तर विद्यमान खासदार विनायक राऊत अद्यापही जिल्ह्यात फिरकलेले नाहीत.

मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील प्रशासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे किंवा आपद्ग्रस्थाना कोणतीही आर्थिक अथवा जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली गेली नाही. मालवण तालुक्यातील तळाशील या समुद्रकिनारच्या गावाला उधनाचा धोका बसला आहे. येथील भूभाग समुद्र गिळकृत करत असून सुमारे 90 घरांना धोका संभावला आहे. मसुरे गावातील खाडीत असलेले खोतजुवा बेटाला पाण्याने वेढले आहे. या ठिकाणी अद्यापही कोणतीही मदत पोचलेली नाही. तब्बल 130 लोक या बेटावर अडकले आहेत. इथे लोकांची वस्ती असून ती पावसात नेहमीच धोक्याच्या छायेखाली असते.

0 Reviews

Write a Review

Goa News Hub

Read Previous

माझ्या विरोधात रामदास कदमांनी षडयंत्र रचले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा आरोप

Read Next

Sausi Aramco and Reliance industries sign a non-binding letter of intent to acquire a 20% stake in the oil to chemicals (O2C) division of Reliance industries limited valued at an enterprise value of US$ 75 billion

Leave a Reply