सिंधुदुर्गतील घोटगेच्या गुरवांचे इको प्रेंडली गणपती जाणार परदेशात 800 गणेशमूर्तींची अमेरिकेतून मागणी ‘जस्ट डायल’वर केली होती नोंदणी

0
119

 

घोटगे गावचे सुपुत्र आणि कणकवली-कलमठ येथील तनिष आर्ट मूर्तीशाळेचे मालक सदाशिव ज्ञानदेव गुरव यांच्या इको प्रेंडली गणेशमूर्तींना परदेशातून मागणी आली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील मूर्तीकलेसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

गुरव हे दरवर्षी मागणीनुसार साधारणत: 1500 मूर्त्या बनवतात. या सर्वांची विक्री होते. त्यातून आठ ते दहा लाख उत्पन्न मिळते. इको प्रेंडली बाप्पाच्या मूर्तीचे फायदे पाहून सदाशिव गुरव यांच्या पुण्यातील मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या मूर्तीच्या मार्केटिंगसाठी ‘जस्ट डायल’वर नोंदणी केली. त्यातूनच त्यांना या वर्षासाठी एक दोन नव्हे, तर तब्बल 800 गणेशमूर्त्यांसाठी मागणी आली आहे आणि तीदेखील सातासमुद्रापार अमेरिकेतून. यावर्षी आठ मेअखेरपर्यंत सिंधुदुर्गचा इको प्रेंडली बाप्पा पुण्याहून अमेरिकेत जाणार आहे.

गुरव यांचे कुटुंब हे मूर्ती कलेपासून अनभिज्ञ असलेले कुटुंब. पण कलेच्या प्रेमामुळे आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिल्यामुळे पूर्णवेळ स्वतःला यात झोकून दिले. या कामात त्यांच्या पत्नी त्यांना मदत करतात. तसेच त्यांचे दोन्ही भाऊ, भावजया यांचीही मदत होते. शिवाय त्यांनी या कलेच्या माध्यमातून पाच ते सहाजणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

मूर्तिकार गुरव यांनी जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे दहावीचे पासिंग सर्टिफिकेट घेऊन मुंबईतील अंधेरी येथे शिपिंग कंपनीत अवघ्या 655 रुपये प्रतिमहिना वेतनावर वर्कर म्हणून कामास सुरुवात केली. येथे काम करत असतांनाच्या काळात मुंबई येथील गणेश मूर्ती बनवण्याचा कारखाना असलेल्या मोरे कुटुंबातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. कामावरून आल्यावर गुरव  त्यांचे मेव्हणे नंदकुमार मोरे यांच्या गणपती शाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना फिनिशिंग व रंगकाम करण्याचे काम शिकण्यासाठी सायंकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत जात. मूर्तीकलेचे हे कौशल्य ते आठ वर्षे शिकले. परंतु पीओपीच्या मूर्त्यांचे विसर्जन केल्यानंतर समुद्रकिनारी त्यांची विटंबना होत असल्याचे वृत्तपत्रे आणि टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये पाहून ते अस्वस्थ व्हायचे. आपण ज्या मूर्त्यांमध्ये जीव ओततो, त्यांची अशी विटंबना त्यांना अस्वस्थ करू लागली. त्यातून आपण पर्यावरणपूरक मूर्त्या तयार कराव्यात, असा विचार त्यांच्या मनात आला आणि कणकवली विद्यामंदिर येथे इको प्रेंडली मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण जे. जे. आर्टचे शिक्षक अविनाश पाटकर व त्यांचे सहकारी प्रसाद राणे यांच्याकडून घेतले.

या मूर्त्या रद्दी पेपर, शाडू माती, पांढरी माती, झाडांचा नैसर्गिक चिक म्हणजेच गम यांच्या मिश्रणापासून साकारल्या जातात. मातीच्या मूर्तीच्या तुलनेत या खूप हलक्या असतात. एक व्यक्तीही चार-पाच फुटी मूर्ती सहज उचलू शकते.

मूर्ती विसर्जनानंतर काही तासातच त्या पाण्यात विरघळतात. त्यांचा कोणत्याही जलचर जीवांना धोका पोहोचत नाही आणि किनारे स्वच्छही राहतात. असा स्वच्छ परिसर राहिला तर येणारी पिढी मोकळा श्वास घेऊ शकेल. पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरामुळे मूर्ती सुबक व आकर्षक आहेतच. शिवाय बाप्पांचा मानही राखला जाईल. श्रद्धा, संस्कृती जपली जाईल. निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि म्हणूनच अशा सगुण स्वरुप बाप्पाची मूर्ती आपल्या आणि इतरांच्याही घरी असावी. सिंधुदुर्गची इको प्रेंडली जिल्हा म्हणून ओळख व्हावी, यासाठी जिह्यातील मूर्तिकारांनी अशा मूर्त्या तयार करून सर्वदूर पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा मूर्तिकार गुरव यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here