सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास राज्यशासनाची परवानगी, दशावतार ,भजन, कीर्तन या लोककलांचा मार्ग मोकळा कोकणात लोककलावंतांना दिलासा

0
188

सिंधुदुर्ग – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळया जागेत

होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक ५ नोव्हेंबर, २०२० पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे दशावतार , भजन, कीर्तन या लोककलांचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी लोककलावंतांसोबत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती.

आमदार वैभव नाईक यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाला दशावतारी नाट्य प्रयोग कोविड बाबतचे शासनाचे नियम व अटींचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय निर्गमित करून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मिशन बिगिन अंतर्गत राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देण्यामागील शासनाचा उदात्त हेतू विचारात घेऊन सर्व संबंधितांनी बंदिस्त सभागृहे / मोकळया जागेत होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन कोविड-१९ संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निबंधांचा भंग होणार नाही अशा पध्दतीने करणे आवश्यक आहे. कोविड-१९ विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here