सिंधुदुर्ग – आमदार वैभव नाईक यांच्या शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी आज भेट देऊन पाहणी केली. १०० बेडचे हे कोविड केअर सेंटर असून सध्या २५ रुग्ण याठिकाणी दाखल आहेत. तर ७५ बेड उपलब्ध आहेत. तसेच दाखल होणाऱ्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची गरज भासल्यास २ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केलेली आहे. रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असून काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. फार्मसी कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटरसाठी देऊन आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या रुग्णसेवेबद्दल ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, जेवण,रुग्नांना येण्या-जाण्याची सोय याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, तेल, पावडर, आदी साहित्याचे किट तसेच रुग्नांना वाफ घेण्यासाठी स्टीमर, गरम पाण्याची किटली हे साहित्य मोफत स्वरूपात देण्यात आले. कोविड टेस्ट रिपोर्ट उशिराने येत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून देखील कोविड टेस्ट करण्याची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर,नगरसेवक सुशांत नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे,आरोग्य कर्मचारी प्रशांत बुचडे, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड हर्षद गावडे, प्रा. मंदार सावंत, निलेश मोहिते यासंह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.