वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री ठाकरे

0
133

 

राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर वाहतुकीच्या नियमांसाठी दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 चे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस यंत्रणा नेहमीच आपल्या युनिफॉर्ममध्ये कर्तव्य बजावत असतात. म्हणून सामान्य जनता विविध उत्सव-सणांचा आनंद घेऊ शकते. या आनंदाचे खरे मानकरी ही पोलीस यंत्रणाच आहे. वाहतुकीचे नियम शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मुलांना नियम समजल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांना समजावून सांगतात. त्यासाठी मुलांना सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलीसांचे लक्ष आपल्यावर असते. वाहन चालविताना नियमाचे पालन करावे.

सन 2005 साली चीनचे अपघाताचे प्रमाण 94 हजार आणि भारताचे 98 हजार होते. चीनचे आता 45 हजारावर आहे तर भारताचे 1.50 लाखावर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आपली सुरक्षा ही कुटुंबांची सुरक्षा’ समजून शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवावा, असे आवाहनही श्री.ठाकरे यांनी यावेळी केले.

परिवहन मंत्री म्हणाले, माणसाचे जीवन हे मेणबत्तीसारखे असते. एखादा अपघातसुद्धा माणसाची ज्योत विझवून कुटुंबावर अंधार पसरवितो. वाहतुकीसंबंधी सर्व घटकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. गेल्या वर्षभरात 12 हजार 556 लोक केवळ रस्ते अपघातात मृत्यू होणे हा आकडा छोटा नाही. याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसार माध्यम, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन पुढील वर्षभरात 10 टक्क्यांपेक्षा अधिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करुन शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्टे समोर ठेवून सर्वांनी कार्य करावे.

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, जीवन हे महत्वाचे आहे. इंटरनेटचा वेग 4 जी वरुन 5 जी झाला म्हणून आपण वाहन चालवत असताना वाहनाची गती वाढवू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे. नगरविकास विभागाकडून विकास नियंत्रण नियमावली तयार करताना परिवहन विभागाचा समावेश करुन विकास आराखडा तयार करावा. ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेवर अधिक लक्ष द्यावे. त्यासाठी विशेष निधीची तरतुद करावी.

कार्यक्रमाला परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मधुकर पांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड, वाशिम, ठाणे या जिल्ह्याच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सत्कार करण्यात आला. कौतुकास्पद काम करणारे म्हणून तेजस्विनी हेगडे, गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, हार्दिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या चालकांनी विना अपघात 25 वर्ष सेवा केली त्यांचाही सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here