मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार जलदगतीने

0
126

 

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम आता अधिक जलद गतीने होणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर दोन तालुक्यांमधील एकूण ३४ गावांसाठी वाढीव मोबदल्याच्या मार्ग आता मोकळा झाला आहे. एकूण ४९ कोटी रकमेपैकी २६ कोटींचा मोबदला नुकताच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला. उर्वरित २३ कोटी रक्कम लवकरच वर्ग केली जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रत्नागिरी तालुक्यातील १२ आणि संगमेश्वर तालुक्यातील २२ अशा एकूण ३४ गावांचा सामावेश आहे.

रत्नागिरीतील चार आणि संगमेश्वरमधील सहा अशा एकूण दहा गावांचा निवाडा पहिल्या टप्प्यात, तर त्यानंतर दुसऱ्या टप्यात पुन्हा १९ गावांचा निवाडा जाहीर करण्यात आला. या सर्व २९ गावांसाठी शासनाकडून भरपाईची एकूण ३९७ कोटी ३ लाख ५४ हजार ८०२ इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. या रकमेपैकी ३८१ कोटी रूपयांचा निधी मार्चमध्ये प्राप्त झाला आहे. यापैकी २०३ कोटी इतका निधी रत्नागिरी तालुक्यासाठी, तर १७८ कोटी एवढी रक्कम संगमेश्वर तालुक्यासाठी वितरीत करण्यात आली होती .रत्नागिरी तालुक्यातील पाली , पाली बाजारपेठ , चरवेली , कोठारेवाडी या चार गावांचा तसेच संगमेश्वरमधील निढळेवाडी अशा एकूण ५ गावांचा निवाडा पुढे ढकलण्यात आला होता. त्यासाठी ९३ , २२ , ८६ , ६२५ इतक्या रकमेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही रक्कमही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही खातेदारांच्या जमिनीचे अधिक क्षेत्र या संपादनात गेल्याने त्यांनी फेर मोजणीसाठी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील वाढीव मोबदल्याची ४९ कोटी इतकी रक्कम होत होती. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यासाठी ३७ कोटी, तर रत्नागिरी तालुक्यासाठी १२ कोटी रूपयांचा वाढीव मोबदला जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा निधीही रेंगाळला होता. त्यापैकी २६ कोटीचा निधी काही दिवसांपूर्वीच उपविभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. त्यातील ५ कोटींचा निधी रत्नागिरीसाठी, तर २१ कोटींचा निधी संगमेश्वर तालुक्यात वितरीत करण्यात येणार आहे . उर्वरित २३ कोटींपैकी रत्नागिरीला ७ कोटींची , तर संगमेश्वरला १६ कोटींच्या निधीची अद्याप प्रतीक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here