मालवणात पुन्हा गोव्यातील ट्रॉलर लुटण्याचा प्रकार

0
173

 

सिंधुदुर्ग – मालवण समुद्रात गुरुवारी रात्री गोव्याच्या ट्रॉलरवरील मासळी लुटण्याचा प्रकार समोर आला. युवकांच्या टोळक्याने गोव्याच्या ट्रॉलरवर चाल करून जात त्याने पकडलेली सर्व मासळी लुटली. भर समुद्रात चाललेल्या या थरारामुळे परिसरात मासेमारी करणाऱया अन्य मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही अशाचप्रकारे मालवण समुद्रात मासळी लुटण्याचे प्रकार घडले होते. नंतर समुद्रात संघर्ष टाळण्यासाठी गोवा व सिंधुदुर्गातील मच्छीमारांमध्ये यशस्वी शिष्टाई झाली होती. आता पुन्हा ट्रॉलर लुटण्याचे प्रकार सुरू झाल्याचे समोर आले आहे.

मालवण समुद्रात यापूर्वी गोव्याच्या ट्रॉलरवरील मासळी लुटणे आणि ट्रॉलरवरील साहित्य चोरीप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. पोलिसांनी अनेक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करत सर्वांना अटक केली होती. यात चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले होते. नंतर समुद्रातील संघर्ष थांबला होता. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा समुद्रात मासळी लुटण्याचा प्रकार सुरू झाला. यात किनाऱयावरील एकाच ठिकाणातील 25 व्यक्ती सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे.

गोव्याचा ट्रॉलर लुटल्यानंतर त्या ट्रॉलर मालकाने सिंधुदुर्गच्या प्रशासनाकडे दाद मागितल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱयाने तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मालवणातील मासळी लुटणाऱया ग्रुपची माहिती मिळाली आहे. या ग्रुपने यापूर्वीही अनेक बोटी लुटल्याचीही माहिती आता पुढे येत आहे.

मालवण मार्केटमध्ये लुटलेली मासळी विक्रीसाठी एका बोटीतून आज येथील किनाऱयावर आणल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने संबंधित बोटीवर जाऊन तपासणी केली. यात बोटीवर कोणतीही जाळी नसताना मोठय़ा प्रमाणात मासळी दिसून आली. याबाबत बोट मालकाला जाब विचारल्यावर त्याचीही भंबेरी उडाल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे मासळी लुटीचा प्रकार समोर येणार आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. मालवण मार्केटमध्येही आज बोटीवर प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशी सुरू करण्यात आल्यावर लुटीमध्ये सहभागी असणारे अनेकजण भूमिगत झाल्याचे समोर येत आहे.

मासेमारी जाळी समुद्रात मारल्यानंतर एका ट्रॉलरच्या सहाय्याने त्या बोटीवर जाऊन त्यावरील खलाशी व तांडेलांना धमकी देत त्यांच्याकडील पकडलेली मासळी आणि मासळीचे टबही चोरून आणण्याचे प्रकार घडले होते. मासळीचे अनेक टब संबंधितांच्या घरातही असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. यामुळे चौकशीतून या ट्रॉलर लुटीमध्ये कितीजणांचा समावेश आहे, हे समोर येणार आहे.

समुद्रातील संघर्ष पेटण्याची चिन्हे

मासेमारी हंगाम 31 मे रोजी संपत असताना मालवण येथे समुद्रात गोव्यातील ट्रॉलर लुटीचा प्रकार समोर आल्याने भविष्यात पुन्हा एकदा गोवा आणि मालवण असा समुद्रातील संघर्ष उफाळून येण्याची भीती आहे. त्यामुळे ट्रॉलर लुटीचे प्रकार थांबवून प्रशासकीय पातळीवर यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here