सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातल्या माडखोल येथील धरण ओव्हर फ्लो झाल्याने अतिउत्साही पर्यटकांमुळे याठिकाणी पुन्हा अघटित घडू नये यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार चौकीदार नेमण्यात आला आहे. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने स्थानिक ग्रामस्थाची चौकीदार म्हणून नेमणूक करण्यात आली असून विनाकारण या ठिकाणी कोणीही फिरू नये अशा सूचना देण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईबाबतचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
माडखोल धरण ओव्हरफ्लो झालेले असताना आठ दिवसांपूर्वी या ठिकाणी दोन अतिउत्साही पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर स्थानिक युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने या दोघांचेही प्राण वाचवले होते. अशा प्रकारे अतिउत्साही पर्यटकांमुळे या ठिकाणी दुर्घटना घडून नये यासाठी या ठिकाणी चौकीदाराची नेमणूक करावी तसेच आवश्यक त्या सुविधांसह सूचना फलक तात्काळ उभारावेत अशी मागणी माडखोलवासियांच्यावतीने जिल्हा बॅन्जो विकास मंडळाचे अध्यक्ष लखन आडेलकर यांनी केली होती.
या मागणीची पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी तात्काळ दखल घेत धरणाजवळ सूचना फलक लावून चौकीदाराची नेमणूक केली आहे. तसेच दर बुधवार, शनिवार, रविवार या दिवशी धरणाजवळ होमगार्ड, पोलिस हवालदार याना तैनात ठेवण्याबाबत पोलिस प्रशासनाकडे लेखी पत्राने मागणी केल्याची माहितीही कविटकर यांनी दिली आहे.