माजी खासदार निलेश राणेंची भाजपच्या प्रदेश सचिवपदी वर्णी मुंबई बैठकीनंतर प्रदेश भाजपकडून महत्वपूर्ण घोषणा

0
140

 

​​सिंधुदुर्ग – ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांची भाजपाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई बैठकीनंतर प्रदेश भाजपकडून महत्वपूर्ण घोषणा

भारतीय जनता पार्टीची विभागीय बैठक मुंबई येथील भाजपा कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर सोपवली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात केली आहे मजबूत पक्ष बांधणी

रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी भाजपाचे अस्तित्व नगण्य होते. कार्यकर्त्यांची मजबूत फळीही उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रदीपक यश मिळविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ३०१ जागा निवडून आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाने मिळविलेल्या उत्तुंग यशाची दखल म्हणून माजी खासदार निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरीत ३०० हुन अधिक जागा भाजपाकडे

निलेश राणे यांच्यावर रत्नागिरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची जबाबदारी होती. त्यांनी योग्य पध्दतीने मोर्चेबांधणी केल्यामुळे त्या ठिकाणी तीनशेहून अधिक जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेवून ही निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली,अतूल काळसेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here