महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा मच्छीमारांना फटका 

0
108

राज्यात सध्या मुख्यमंत्री पदावरून सत्ता नाट्य रंगले असताना कोकणातला मच्छिमार मात्र चांगलाच मेटाकुटीला आला आहे. अडचणी खूप आहेत परंतु दाद कोणाकडे मागायची अशी स्थिती मच्छिमार बांधांवांची झाली आहे. कोकणात अवकाळी पाऊस व चक्री वादळामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील राजकीय साठमारीत मच्छिमारांच्या नुकसानभरपाईकडेही दुर्लक्ष होत आहे.

ठाणे ते सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर १८४ मच्छिमार बंदरे यावर  २८ हजार मासेमारी नौका आहेत. यावर ३ लाखांपेक्षा जास्त मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. पाऊस व वादळी स्थितीमुळे येथील मच्छिमार व्यावसायिकांना यावर्षी ७० टक्के व्यवसायाला वंचित व्हावे लागले आहे.

कोकण किनारपट्टी अलीकडे नैसर्गिक आपत्ती आणि वादळे यांच्या तडाख्यात सापडत आहे. चालू २०१९ या वर्षात अरबी समुद्रात ४  महाचक्रीवादळे निर्माण झाली. १९०२ नंतर म्हणजे तब्बल ११७ वर्षांनंतर अशी स्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने स्पष्ट केली आहे. २०१९ मध्ये अरबी समुद्रात वायू, हिक्का, क्यार व महा अशी चक्रीवादळे निर्माण झाली. या चारही चक्रीवादळांमुळे पश्चिम किनारपट्टीला अर्थात कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. १९८१ पासूनची माहिती हवामान विभागाकडे आहे. १९०२ साली ५ चक्रीवादळे निर्माण झाली. त्यातील ४ चक्रीवादळे मोठी होती. शिवाय १९८४, १९७५, १९८२, १९९८, २००४ व २०१५ सालीही अरबी समुद्रात अनेक नैसर्गिक घडामोडी घडल्या. अनेक लहान-मोठी वादळे या काळात आली. १९७५ नंतर यात आणखी वाढ झाल्याचे आढळले आहे. १९८८ मध्ये ६ चक्रीवादळ सदृश वादळे निर्माण झाली. त्यातील तीन वादळांचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले, तर २००४ मध्ये तीन महाचक्रीवादळे या किनारपट्टीवर धडकली होती. २००९ सलत कोकण किनारपट्टीवर धडकल्या फयान वादळामुळे कोकणातील मच्छिमारांचे सुमारे २५० कोटींचे नुकसान झाले. या वादळात अडकलेले जवळपास ८० खलाशी आजही बेपत्ता आहेत.

कोकणात आधीच एलईडी दिव्यांच्या साहय़ाने होणारी विध्वंसकारी, बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण अशा मानवनिर्मित  संकटांमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यात यावर्षीच्या सुरुवातीपासूनच मत्स्य दुष्काळजन्य स्थिती होती. तर मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून चक्रीवादळांच्या निसर्गनिर्मित संकटांनी मच्छिमारांना घेरले आहे. ठाणे, पालघर येथील सुक्या मासळीचा व्यवसाय देखील अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here