महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे शपथबद्ध

0
110

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली होती. त्यांचा शपथविधी सोहळा आजच होणार होता. तो काही वेळापूर्वीच पार पडला आहे. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन नेत्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी आई वडिलांच्या स्मृतींना स्मरुन शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शपथ घेतली. तर सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शपथ घेतली.

जयंत पाटील यांनी वडिलांसोबत आईचंही नाव घेऊन शपथ घेतली. तसंच शरद पवारांचंही नाव त्यांनी शपथ घेताना घेतलं. तर छगन भुजबळ यांनी महात्मा फुले, सावित्री फुले, शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला स्मरुन तसंच शरद पवारांचं नाव घेत त्यांनीही शपथ घेतली. त्यांच्यासोबतच बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.

‘हीच ती वेळ’ असा नारा देत शिवसेनेने निवडणूक प्रचार केला. शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. लोकांनी कौलही महायुतीलाच दिला होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपा आणि शिवसेना यांचं मुख्यमंत्रीपदावरुन झालेलं भांडण आणि त्यानंतर झालेला घटस्फोट हा महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here