पक्षाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही!
पणजी: राज्यात घडलेल्या ऐतिहासिक ‘सार्वमता’वर मगोपने आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. त्यानंतर पन्नास वर्षांचा काळ लोटला आहे, तरीही मगोप पक्षाची ‘सार्वमता’वरून बदनामी केली जात आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी चालविलेला बहुजनांचा विकासाचा वारसा या पक्षाने आजही जोपासला आहे, मुख्य प्रवाहात आलेले बहुजन अनेकांना पहावत नाहीत. ‘सार्वमता’वरून वारंवार पक्षाची कोणी बदनामी करीत असेल, तर खपवून घेतली जाणार नाही. ॲड. भेंब्रे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे पक्ष निश्चित पावले उचलतील, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.
यूट्यूबवरील एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ॲड. भेंब्रे यांनी मगोपवर टीका केली, त्या टीकेवर ढवळीकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ढवळीकर यांनी सांगितले की, सार्वमताची त्यावेळी घेतलेली भूमिका ही त्या-त्या परिस्थितीनुसार होती. भाऊसाहेब बांदोडकरांसारख्या दृढनिश्चयी नेत्याने त्यावेळी बहुजनांना घेऊनच सार्वमताला सामोरा गेला होता.
सार्वमतानंतरही मगोप राज्यात सत्तवेर आला आणि १४ वर्षे राज्य करताना राज्याचा विकास केला. बांदोडकरांनी बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. सार्वमताला होऊन पन्नासपेक्षा जास्त वर्षांचा काळ लोटला तरीही, सार्वमताचा विषय काढून मगोपला दुषणे देण्याचे काम अजूनही काही घटक करीत आहेत.
मगोपकडे अनेकजण व्यक्तीदोषाने पाहत आहेत, परंतु आजही राज्यात प्रत्येक मतदारसंघात मगोपचा कार्यकर्ता आहे.
मगोपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्यांकडून असली अपेक्षा नव्हती, परंतु काहीजणांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचा दात वेगळे असतात, हेच पक्षावर टीका करणाऱ्यांकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होते, असे सांगत ढवळीकर यांनी ॲड. भेंब्रे यांनी केलेल्या टीकेमुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता सार्वमतावरून वारंवार कोणीही उटतो आणि मगोपला दोष देतो. खरेतर सार्वमतानंतर पक्षाची भूमिका व कार्य काय, ते त्यांनी पडताळून पाहिले पाहिजे. पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन टीका करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलण्याविषयी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.