22 C
Panjim
Sunday, January 23, 2022

भाविकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रा मार्ग सील आंगणे कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा आरोग्य तपासणी करून मंदिरात दिला जाणार प्रवेश

Latest Hub Encounter

सिंधुदुर्ग – भाविकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रा मार्ग सील करण्यात आला आहे. ही कोकणातील सर्वात मोठी यात्रा असून कोरोनामुळे या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आंगणे कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा आरोग्य तपासणी करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यात्रा परिसरात दुकान लावण्यासही परवानगी नाही. असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.

आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील मालवण येथील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा ६ मार्च रोजी सपन्न होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील ५०-५० व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने सील केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात एकही दुकान अथवा विक्रेताही असणार नाही. अश्या सक्त सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

रस्ते भावीकांसाठी बंद करण्याच्या सुचना

राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आंगणे ग्रामस्थ मंडळ यांची महत्वपूर्ण बैठक आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आंगणेवाडीत येणारे रस्ते भावीकांसाठी बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

जत्रेची ६ मार्च तारीख निश्चित

आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबीय मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही. राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रे दरम्यान मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. असेही प्रशासनाने स्पष्ट केले. भराडीदेवी यात्रा भाविकांसाठी रद्द केली असली तरीही धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत. जत्रेची ६ मार्च तारीख निश्चित झाली आहे.

यात्रेला मुंबई, पुणे भाविक कोकणात दाखल होतात

आंगणेवाडीतील या देवीची ख्याती देशा-परदेशात पसरली आहे. त्यामुळे दरवर्षी भरणार्‍या या देवीच्या दीड दिवसांच्या यात्रेला मुंबई, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमणी कोकणात दाखल होतात. मात्र यंदा सगळीकडे कोरोनाचे सावट पसरलेले आहे.त्यामुळे यंदा हा वार्षिकोत्सव मर्यादित स्वरुपाचा होणार असून यावेळी फक्त आंगणेकुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितित पार पडेल अशी माहिती आंगणेकुटुंबीयांकडून देण्यात आलेली आहे.आंगणेवाडीची जत्रा ही मालवणातील केवळ आंगणे या गावातील असते. मात्र त्याची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -