सिंधुदुर्ग:- तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण व महाराष्ट्रातील राज्याच्या सीमेवरच गाव असणाऱ्या दोडामार्ग येथे राहणारी 22 वर्षांच्या तरुणीच्या कलानिर्मितीतून केलेल संशोधन संशोधन राष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा विषय ठरल आहे. सुरुवातीपासूनच आर्ट, क्राफ्ट या कलेची आवड असणारी श्वेता बर्वे या तरुणीने आपल्या बागेत फुकट जाणाऱ्या सुपारी झाडावरील विर्यापासून पासून उत्तम पर्यावरण पूरक असलेली चप्पल निर्मिती चे यशस्वी संशोधन केले आहे. इतकेच नाही तर या संशोधनाच पेटंटही मिळवल आहे. या पर्यावरण पूरक उत्कृष्ट कला निर्मिती असलेल्या संशोधनाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शन मिळाल्याने आता या तरुणीचा उद्योग लवकरच कोकणात दोडामार्ग येथे उभा राहणार आहे. मार्च महिन्यापासून या चप्पल निर्मितीचा उद्योग सुरू होणार आहे. अंदाजे तीनशे रुपयांपासून ही चप्पल मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे.
या तरुणीच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनोख्या कला निर्मितीमुळे रोजगाराची नवीन दिशा मिळणार आहे. या संशोधनामुळे या कोकणातल्या सुपारीच्या बागेत फुकट जाणाऱ्या या विरीला आता कला संशोधनाच्या निर्मितीच कोंदण मिळणार आहे. बागेत फुकट जाणारी विरीला आता प्रत्येकी दोन रुपये प्रमाणे दर मिळणार आहे. कोकणातील सुपारी बागेला यामुळे महत्त्व प्राप्त होणार आहे. श्वेता बर्वे हिला या संशोधनाच चप्पल निर्मितीच पेटंट मिळाल्यानंतर आता पंतप्रधान महिला उद्योजिका या योजनेअंतर्गत या पर्यावरण पूरक असलेल्या चप्पल निर्मितीच्या उद्योगासाठी अर्थसहाय्य मिळाल आहे. यातून रोजगार पूरक रोजगार निर्माण होणार असून पर्यावरण पूरक असलेली ही चप्पल टिकाऊ असणार आहे. यासाठी कोणतेही केमिकलसदृश्य पदार्थ वापरले जाणार नाहीत.या उद्योगातून ही चप्पल बाजारात आणताना चप्पल बनविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण सुद्धा श्वेता बर्वे हिने घेतल आहे.
या चप्पल निर्मितीचा पेटंट श्वेता बर्वे हिला मिळाल्यानंतर सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते अलीकडे एका कार्यक्रमात पुणे बाणेर येथे तिचा सत्कार करण्यात आला.
सुपारी बागायतदारांनी आपल्या बागेतील सुपारीच्या पौल्या (विर्या) एकत्र करून ठेवाव्यात.काही ठिकाणी ग्रामीण बोलीभाषेत सुपारी बागेतील विर्याना पौल्या असेही म्हटले जाते. या विर्या पौल्या योग्य तो मोबदला देऊन नेण्याची व्यवस्था बर्वे हिच्या उद्योगाकडून केली जाणार आहे. यासाठी कोकणातील बागायतदारांनी आपल्याला देऊन सहकार्य करावे असेही आवाहन या संशोधक असलेल्या युवतीने केल आहे. त्यामुळे या नवनवीन असलेल्या उद्योगातून सुपारी बागायतदारांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोतही निर्माण होणार आहे.
आई-वडिलांची सुपारी नारळ आंबा बागायत हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील सुपारी झाडापासून मिळणाऱ्या विर्या त्यांचा उपयोग केवळ टाकाऊ किंवा जळण म्हणूनच होत आला आहे. 2019 मध्ये कोविड पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सहज प्रयोग करत श्वेताने स्वतःसाठी म्हणून या प्रकारची चप्पल बनवली. ही आगळीवेगळी असलेली अनेकांच्या पसंतीही उतरली. स्वतःसाठी मोठ्या नंबरची लागते व चप्पल ती सहज मार्केटमध्ये उपलब्ध होत नसल्याने व ब्रांडेड कंपनीची चप्पल खरेदी करावी लागत असल्याने आपण स्वतःसाठी चप्पल म्हणून बनवली होती व ही चप्पल मी सगळीकडेच जाता येता वापरत होते. अशा स्वरूपाची चप्पल अनेकांना अगदी अल्पटात घरगुती स्वरूपातही बनवून दिल्या. या कृषी पूरक कला निर्मितीच्या प्रयोगाला संशोधन उद्योगाचा दर्जा मिळेल असं कधीही वाटलं नव्हत पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका कार्यक्रमात डॉ. माशेलकर कर यांच्या टीम मधील श्री. शास्त्री सरांनी ही माझी कला निर्मिती पाहिली आणि तिथूनच माझ्या कला संशोधनाला पाठबळ मिळालं मला चांगली माणसे भेटत गेली आणि पेटंटही मिळालं यासाठी मला अनेकांचे मार्गदर्शन मिळालं अशी माहिती श्वेता बर्वे हिने ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’ जवळ बोलताना दिली.
तळकोकणातील श्वेता बर्वे हिचे शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज (एस.पी.)महाविद्यालयातून झाले असून अर्थशास्त्र विषयातून बँकिंग इन्शुरन्स मधून तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता डी.वाय.पाटील महाविद्यालयातून श्वेता एमबीए करत आहे. श्वेता बर्वे हिचा हा आता पर्यावरण पूरक असलेल्या चप्पल निर्मितीचा उद्योग दोडामार्ग तालुक्यात तळकट येथे तिच्या गावी लवकरच सुरू होणार आहे.