पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट खचला : मात्र संबंधित विभाग झोपेत

0
128

सिंधुदुर्ग – करूळ घाटमार्ग मोठ्या प्रमाणात खचला आहे. खचलेल्या ठिकाणी वैभववाडी पोलीस प्रशासनाने तात्काळ बँरल व रिफ्लेक्टर लावले आहेत. अतीवृष्टीत राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा मात्र सुशेगाद असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घाटात घटनास्थळी सद्यस्थितीत पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या मार्गावरून एकेरी वाहतूक चालू आहे.

चालू वर्षीपासून तरेळे- गगनबावडा, कोल्हापूर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र या विभागाचे ऑफिस वैभववाडी तालुक्यात नसल्याने अतिवृष्टीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहेत. साईड पट्टीवर मोठ्या प्रमाणात झाडी आली आहे. ठिकठिकाणी रस्ता खड्डेमय झाला आहे. साईड पट्टी तुटून गेली आहे. घाट मार्गात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे सत्र सुरू आहे.

सोमवारी पहाटे पायरी घाट दरम्यान मोरी असलेल्या ठिकाणी घाट खचला. मुसळधार पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे घाट मार्गातून जीव मुठीत घेवून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. खचलेल्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने बॅरल व रिप्लेक्टर लावले आहेत.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस नाईक गणेश भोवड आदी घटनास्थळी तळठोकुन आहेत.

नायब तहसीलदार अशोक नाईक, मंडळ अधिकारी दीपक पावसकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. संबंधित विभागाने या ठिकाणी तात्काळ उपाययोजना न केल्यास घाट आणखी खचण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here