नारायण राणे यांच्या पत्नीसह तीस मिळकतधारकांना नोटीस

0
34

 

महाबळेश्वर तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बांधकाम केल्याबद्दल नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह तीस मिळकतधारकाना नोटीस बजावण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशावरून वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी ही नोटीस बजावली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामाबाबत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.

महाबळेश्वर येथील अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात सन २०१५ मध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यामध्ये संबंधित अनाधिकृत बांधकामे अतिसंवेदनशील अशा वनसदृश क्षेत्रामध्ये करण्यात आली असल्याने ती हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारचे आदेश सातारा जिल्हाधिकारी आणि वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेबाबत सुनावणी होऊ न हरित लवादाने ३ डिसेंबर २०१९ रोजी आदेश दिले आहेत. त्या प्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार बजावलेल्या या नोटिशीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी बजावलेल्या नोटिशीमध्ये नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह तीस मिळकतधारकांचा समावेश आहे. यांची नावे आणि कंसात त्यांच्या मिळकतीचे गाव पुढीलप्रमाणे – नीलम नारायण राणे (क्षेत्र महाबळेश्वर), खुशिद इस्माई अन्सारी (खिंगर),सदानंद माधव करंदीकर (खिंगर), शिरीष मधुसूदन खेर (खिगर ), विकुल बाबु दुधाणे, संग्रामसिंह अप्पासाहेब नलवडे (भेकवली), मनीषा संतोष शेडगे (शिंदोळा), गीताश्री अशोक भोसले(कुभरोशी), संतोष हरीभाऊ जाधव (कुंभरोशी), मनोहर रामचंद्र शिंद(कुंभरोशी), शंकरलाल बच्चुभाई भानुशाली(दुधोशी), आसावरी संजीव दातार(दरे), विठ्ठल दगडु गोळे, शांताराम परबती गोळे (भोसे), केशब धोंडीबा गोळे(भोसे), राजन भालचंद्र पाटील(मेटतळे), भोलू लेखराज खोसला(मेटतळे), आरची डॅनियन डिसुझा (मेटतळे), कुसुम प्रताप ओसवाल (मेटतळे भोसे), चंद्रशेखर चंद्रकात साबणे (मेटतळे), संदीप नंदकुमार साळवी (मेटतळे), रक्षक अतुल चित्तामणी साळवी(मेटतळे), आरची डेनियन डिमझा (मेटतळे), खेमजी नानजी पटेल(मेटतळे), आरची डेनियन पटेल(मेटतळे), पूजा गजानन पाटील, आनंदा राय कांबळे, रश्या शैलेश पां कांबळे (अवकळी), प्रल्हाद नारायणदास राठी (क्षेत्र महाबळेश्वर), मोशा बाबुलाल पांचाळ आदींचा समावेश आहे.

’ राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार महाबळेश्वर येथील वनसदृश क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या अनधिकृत मिळकत धारकांस नोटीस बजावण्यात आली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील व वनसदृश क्षेत्रामध्ये बांधकामाच्या अनुषंगाने पुरावे कार्यालयास सादर करावेत, अन्यथा राष्ट्रीय हरित लवाद अतिसंवेदनशील क्षेत्रातील ही बांधकामे अनधिकृत समजून दूर करण्याचे आदेश देईल असेही लवादाने म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here