सिंधुदुर्ग – तळकोकणात सध्या शिमगोत्सवाची धुम सध्या पहायला मिळतेय. धुळवडी नंतर शिमग्याचा उत्साह तर शिगेला पोचला आहे. सिंधुदुर्गात गावागावातील काही हौशी मंडळे घरोघरी जाऊन पौराणिक वेशभूषेत खेळ करतात तर काही ठीकाणी राधा कृष्ण नाचवले जातात.
यात ब्रह्मराक्षस, हनुमान, कृष्ण अशी आकर्षक वेशभूषा करून नाचे पौराणिक गाण्यावंर नाचत निखळ मनोरंजन करतात. हे खेळ पाहण्यासाठी लोकही गर्दी करतात.
दशावतार ही कोकणातली विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला आहे. या लोककलेचा प्रभाव अन्य कलांवर देखील पडलेला आहे. थोडीशी दशावताराला समांतर जाणारी लोककला म्हणजे शिमगोत्सवातील गोमूचा नाच अर्थात खेळे नाचवणे. काही ठिकाणी याला राधा नाचणे देखील म्हटले जाते. होळीच्या उत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकाच्या दारात गोमूचा नाच घेऊन लोककलावंत येतात त्यांना दक्षिणा म्हणून कोकणी माणूस अगदी आनंदाने काहीतरी दक्षिणा देतो. होळी उत्सव हा कोकणातील माणसाच्या कलागुणांना वाव देणारा उत्सव म्हणून देखील समजला जातो. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात होळीच्या निमित्ताने गोमू नाचाच्या माध्यमात लोककलावंतांच्या कलागुणांचा उत्सव सुरू असल्याचे दिसून येत आहे.