सिंधुदुर्ग – जिल्हयातील कोरोना रूग्णांच्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अयोग्य पद्धतीने कामकाज सुरू आहे. रॅपिड अॅटिजन टेस्टबाबत विश्वासार्हता नसताना या टेस्टवर भर दिला जात असून त्यामधून पॉझिटीव्हची संख्या वाढत आहे. असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. ते कणकवली येथे बोलत होते.
शासकीय रुग्णालये तसेच तालुकानिहाय कोविड सेंटरकडे होणारे दुर्लक्ष, तेथील रुग्णांची होणारी गैरसोय, खरेदीतील घोटाळा, चढ्या दराच्या निविदा तसेच उपसंचालक पातळीवर नर्सेसच्या बदल्यांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहाराचा मनसेने वेळोवेळी पर्दापाश केला आहे. असेहि उपरकर म्हणाले.
रुग्णालयात दाखल करून घेतलेल्या रुग्णांचा स्वॅब अहवाल येण्यापूर्वी त्याचे निधन झाल्यास त्यांना अंत्यविधीसाठी नातेवाईकांजवळ सुपूर्द केले जाते. अशा रुग्णांचे रिपोर्ट येईपर्यंत शवागारात ठेवणे आवश्यक असताना तसे केले जात नाही. तालुका कोविड सेंटर हे अन्य जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्यांच्या नियंत्रणात ठेवले जाते. मात्र, आर्थिक गैरव्यवहारासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते आपल्याकडे ठेवून सर्व तालुक्यातील कोविड सेंटर सुरू केलेली नाहीत. कोविड सेंटरमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते. तेथे नेमणूक असलेल्या स्टाफला प्रसाधनगृह नाहीत. तसेच तेथे उपलब्ध असलेली शौचालये व बाथरुम अस्वच्छ आहेत. असेही उपरकर म्हणाले