जानवली उपसरपंच शिवराम राणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे केला प्रस्ताव दाखल

0
78

 

सिंधुदुर्ग – जानवली ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवराम भास्कर राणे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसीलदार आर जे पवार यांच्याकडे दाखल केला आहे.

उपसरपंच शिवराम राणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करताना ग्रामपंचायतच्या सदस्यांनी गावच्या विकासकामाच्या योजनेत हस्तक्षेप करुन योजना राबविण्याबाबत दिरगाई (विलंब ) होण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामसभेमध्ये व पाणी पुरवठा स्वच्छता समितीने मंजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या विरोधात नकारात्मक भूमिका मासिक सभेत मांडणे. जेणेकरून ग्रामसभेने व पाणी पुरवठा स्वच्छता समितीने सुचविलेले पाणीपुरवठा व गावातील कचरा व सांडपाणी बाबतच्या नियोजनात अडचणी निर्माण होऊन लोकांच्या ग्रामपंचायतच्या विरोधात तक्रारी वाढण्यासाठी प्रयत्न करणे, गावातील ग्रामस्थांच्या बांधकामासंबंधी नाहरकत दाखले व असेसमेंटकरीता आलेल्या अर्जामधील नियमबाहय त्रुटी मासिक सभेमध्ये सुचीत करुन ग्रामपंचायत प्रशासनाला नियमानुसार नाहरकत दाखले व असेसमेंटकरीता जास्तीत जास्त कसा विलंब होईल जेणेकरुन सदरचा व्यक्ती ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोध कसा जाईल यासाठी प्रयत्न करणे.

तसेच त्याबाबत गावातील व्यक्तींना ना हरकत दाखले व असेसमेंटच्या विरोधात तक्रारी अर्ज करण्यास प्रवृत्त करणे, त्याचप्रमाणे आलेल्या तक्रार अर्जाच्या बाजूने नियमबाहय मासिक सभेत चर्चा करण्याचा प्रयत्न करणे, उपसरपंच या पदाच्या कर्तव्यात कसूर करणे व ग्रामपंचायतील प्रशासकीय कोणत्याही योजनेस नियमानुसार सहकार्य करण्यासाठी टाळाटाळ करण्याचे प्रयत्न करणे आदि कारणे देत हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. वरील सर्व बाबी या उपसरपंचाच्या कर्तव्यातील कसूर होत असल्याने गावातील विकास योजना राबविण्यास विलंब होत आहे. व शासनाच्या योजनेचा लाभार्थ्यांना वेळेवर लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिरगाई होत आहे. तसेच गावातील ग्रामस्थांचे मागणी केलेल्या अर्जानुसार निर्णय घेवून विनाविलंब कार्यवाही करुन पुर्तता करण्यास दिरंगाई होत आहे. अशी कारणे अविश्वास प्रस्तावात नमूद करण्यात आली आहेत.

या वेळी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करताना दिलेल्या अर्जावर सौ. राजश्री अशोक राणे, सौ.आराध्या हरीशचंद्र पेडणेकर,अजित सखाराम पवार, सौ. लक्ष्मी संतोष सावंत, प्रसाद उदय राणे, सरपंच सौ. शुभदा राजेश रावराणे, सौ.प्रणाली प्रफुल्ल राणे यांनी सह्या केल्या आहेत. तर यातील लक्ष्मी संतोष सावंत या तहसीलदारां समक्ष उपस्थित नव्हत्या. तहसीलदारांकडून ग्रामपंचायत सदस्यांची ओळख पटवून घेण्यात आली. त्यानंतर याबाबत पुढील सात दिवसांत अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक लावून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार आर जे पवार यांनी दिली. दरम्यान उपसरपंच शिवराम उर्फ काका राणे यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या सदस्यांकडून दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावामुळे आता काय निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here