चिपी विमानतळावर स्थानिकांना नोकऱ्या द्या अन्यथा भाजपा आयआरबी विरोधात पाऊल उचलणार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा

0
63

सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने 9 ऑक्टोबर रोजी होत असलेले चिपी एअरपोर्टचे उदघाटन अत्यंत महत्वाचे आहे. मात्र या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे गरजेचे आहे. कवडीमोलाने जमीन देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या , अन्यथा भाजपा आयआरबी कंपनीच्या विरोधात पाऊल उचलणार असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.

शिवसेनेच्या नेत्यांनाच आउटसोर्सिंगचे कॉन्ट्रॅक्ट हवे आहे

शिवसेनेच्या नेत्यांनाच आउटसोर्सिंगचे कॉन्ट्रॅक्ट हवे असल्याने स्थानिकांवर अन्याय होत आहे.असा आरोप राजन तेली यांनी केला. कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते. राजन तेली म्हणाले,ज्या स्थानिक भूमीपूत्रांनी कवडीमोलाने विमानतळासाठी जागा दिली. मात्र आयआरबी कंपनी गोड बोलून स्थानिकांना नोकरीत डावलत आहे.

नारायण राणे यांनी आयआरबी कंपनीच्या मालकाशी यासंदर्भात चर्चाही केली

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या कानावर स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाची बाब घातली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आयआरबी कंपनीच्या मालकाशी यासंदर्भात चर्चाही केली आहे. चुकीच्या पद्धतीने टेंडर दिले असल्यास खपवून घेतले जाणार नाही असेही राणे यांनी सुनावले असल्याचे राजन तेली म्हणाले. चिपी विमानतळ लवकर व्हावे यासाठी भाजपाने नेहमी सहकार्य केले आहे. मात्र स्थानिकांना नोकरीत सामावून घेत न्याय न दिल्यास भाजपा आयआरबी कंपनी विरोधात पाऊल उचलणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एअरपोर्ट उदघाटनाला कोरोनाचा बाऊ कशाला

एकीकडे शिवसेनेने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. खासदार संजय राऊत सेनेचा दसरा मेळावा जोरात होणार असल्याचे सांगितले आहे. मग चिपी एअरपोर्ट उदघाटनाला कोरोनाचा बाऊ कशाला ? दोन केंद्रीयमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री चिपी एअरपोर्ट उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. मग स्थानिक पत्रकारांना प्रवेश का नाकारला? असा सवाल तेली यांनी केला. स्थानिक पत्रकारांनी चिपी एअरपोर्ट बाबत नेहमीच मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला. मात्र एअरपोर्ट उदघाटनाला स्थानिक पत्रकारांना प्रवेश नाही हे चुकीचे आहे. विमानतळासाठी लाईट, रस्ते, पाणी हे प्रश्न प्रलंबित आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांकडे जनतेला गाऱ्हाणे मांडता आले असते मात्र कोरोनाच्या नावाखाली लपवाछपवीचा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले.

खासदार विनायक राऊत यांनी आंजीवडे घाटाबाबत दिशाभूल करू नये

खासदार विनायक राऊत यांनी आंजीवडे घाटाबाबत दिशाभूल करू नये. एकीकडे सरकारच्या तिजोरीत रस्ते दुरुस्तीला निधी नाही आणि आंजीवडे घाटासाठी 350 कोटी निधी मंजूर झाल्याचे खासदार राऊत हे केवळ बाता मारत असल्याची टीका तेली यांनी केली. शासकीय मेडिकल कॉलेजची मंजुरी राणेंमुळे नाकारली हा खासदार राऊत यांचा बहाणा हास्यास्पद आहे. स्टाफ, लायब्ररी, लॅबोरेटरी व अन्य बाबीची अपूर्णता असल्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज ची मंजुरी नाकारली आहे. खासदार राऊत यांनी जनतेची दिशाभूल करू नये ,प्रथम जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यांची स्थिती सुधारावी. आरोग्य विभागात 534 पदांची भरती होणे आवश्यक आहे यासाठी प्रयत्न करावेत. भाजपा जिल्ह्याच्या विकासासाठीसोबत आहे, आमची बांधिलकी स्थानिकांशी ,भूमिपुत्र यांच्याशी आहे असेही राजन तेली यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here