कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
98

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात 31 मार्च रोजी एकाच दिवशी 84 कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोविड – 19 च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवावी व ते कार्यान्वीत करण्यात यावे. खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याची प्रक्रियेविषयी खाजगी रुग्णालयांशी चर्चा करून त्याचे नियोजन करावे. रुग्णालयातील बिलांची तपासणी करणारे पथक पुन्हा कार्यान्वीत करण्यात यावे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी. संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. सुपर स्पेडर्सच्या बाबतीतही संपर्कातील व्यक्तांचा जलदगतीने शोध घेऊन त्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी. गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी मास्क व सुरक्षीत अंतराची अंमलबजावणी कडक करण्यात यावी. ऑक्सिजनचा पुरवठा अखंडीत राहील याची दक्षता घेण्यात यावी. कंटेन्मेंट झोनमधील सर्विलन्स वाढवावा. सर्व प्रांताधिकारी यांनी गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. गर्दी होणारे सांस्कृतीक कार्यक्रम, वाढदिवसासारखे कार्यक्रम बंद करावेत. आरोग्य विभागाने रिकव्हरी रेट वाढवण्यावर आणि मृत्यूदर कमी करण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे यासारख्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here