कोकणातला पाऊस……

0
376

 

जमीन आणि आकाशाचं नातं किती अजब असतं..जमीनीला हसवायला आकाशाला रडावं लागतं… आसू आणि हसू यांचे सुंदर मिलन म्हणजे कोकणातला पाऊस. पावसाळ्यात हिरवा शालू परिधान करून निसर्गाचे मुक्त नृत्य जेथे सुरू असते ते म्हणजे कोकण…. कोकणातील पाऊस म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. सह्यद्रीच्या पर्वत रांगांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, दुधाचे घट फोडत खळखळ वाहणारे ओढे, डोंगरांना आच्छादून टाकणारे काळेभोर ढग, घाट रस्त्यांना कवेत घेणारी धुक्याची दुलई, हिरवाई परिधान केलेली माळ-राणे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ढवळ्या-पवळ्याचे जोत हाकणारा शेतकरी, डोंगर उतारावरच्या हिरव्याकंच शेतीच्या रांगा, खेकड्याचा रस्सा आणि गोड्या पाण्यातील मासळीचे सार, किल्ल्यांवरचे ट्रेक …… हे सर काही म्हणजे कोकणातील पाऊस आणि पाऊस. अर्थात एक लॅन्डस्केप.
अरबी समुद्राचा नितांत सुंदर समुद्र किनारा आणि सह्याद्री पर्वतांच्या भक्कम डोंगर माळा यामधील चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण. कुणीतरी म्हटले आहे देवाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकणाचा भाग असले तरी औद्योगिकरणामुळे ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात निसर्ग अनुभव जवळ जवळ संपलाच आहे. मात्र तो टिकून आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अर्थात हे दोन जिल्हे कोकणातील तळ कोकण म्हणून ओळखले जातात. इथली बोलीभाषा, लोकसंस्कृती, राहणीमान, शेतीसंस्कृती, खाद्यसंस्कृती यात फारसा काही फरक पडलेला नाही. त्याचप्रमाणे टिकून आहे तो इथला निसर्ग. या निसर्ग दुलईत अनेक गुपित दडलेली आहेत. विविध ऋतूत ती माणसाला साद घालत असतात. तसाच इथला पाऊसही आपल्या आविष्काराने इथल्या सजीव श्रुष्टीला नव संजीवनी देतो आणि त्याची भुरळ आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. आपसूकच मग पाऊले वळायला लागतात अन घेऊन जातात खूप दूरवर नव्या जगाच्या दुनियेत.
येथील डोंगर कडे म्हणजे धबधब्यांचे जन्म स्थान. डोंगर माथ्यावर जमलेले पावसाचे पाणी जेव्हा खाली झेप घेते तेव्हा दुरून दिसणारी ती पांढरी शुभ्र रेष म्हणजे सुंदरीच्या काळ्याभोर केसातली जणू रेशमी बटाच भासते. हि बटा अलगद हातात घ्यावी अन तिच्याशी प्रेमालाप करावा असे कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. हीच किमया साधतो कोकणातला पाऊस.
कोकणात अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत त्यात मुंबईच्या जवळचा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातला खोपोली येथील झेनिथ धबधबा प्रसिद्ध आहे. सुमारे २०० फुटांवरून एका सरळ रेषेत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी व त्यात मनसोक्त डुबण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी येथे असते. मुंबईहून रेल्वे मार्गाने येथे जात येते मध्य रेल्वेचे खोपोली हे शेवटचे ठिकाण आहे. पुणे मार्गही येथे जात येते.
कर्जत तालुक्याच्या सीमेवरील डोंगर रांगत वसलेले माथेरान हे समुद्र सपाटीपासून सुमारे १००० मीटर उंचीवर आहे. हे जरी हिल स्टेशन असले तरी येथील पाऊस हा स्वर्गीय अनुभूती देऊन जातो. दोन्ही बाजूला दाटलेली हिरवळ, पिवळ्या हरण फुलांनी सजलेले डोंगर यातून गाडीचा रस्ता मागे टाकत आपण माथेरानचे शिखर गाठतो तेव्हा डोंगरातून दरीत झेप घेणारे धबधबे डोळ्याची पारणे फेडतात. हळूहळू धुक्यात हरवून गेलेले माथेरान येते आणि धुक्यांच्याच शुभ्र दुलईत लपेटलेली गर्द वनराई वेड लावते. आपण माथेरानची वाट चालू लागतो त्यावेळी माथेरान शिखराखालचा प्रदेश पाहताना निसर्गाच्या अनोख्या आविष्कारात आपण हरवून जातो. ढग अगदी आपल्या जवळ येतात, त्यातीलच एका ढगांवर स्वार होऊन सैर करून यावी असं कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. क्षणात धुके त्यात लुप्त होणार पायथ्याचे प्रदेश आणि क्षणात ऊन- पाऊस हा निसर्ग खेळ अनुभवताना अंगाशी लगट करतो तो येथील धुंद हवेतला मंद गारवा. एखाद्या निगरगट्ट प्रियकरालाही आपल्या प्रेयसीची आठवण करून देईल असा हा माथेरानचा पाऊस एकदातरी अनुभवावाच असा. मध्य रेल्वेच्या नेरळ स्टेशन वर उतरून माथेरानला जात येते. त्याशिवाय मुंबई, पुणे आणि कोकण मार्गाने माथेरानला जात येते. माथेरानची टॉय ट्रेन ( मिनी ट्रेन) प्रसिद्ध आहे परंतु सध्या ती बंद आहे. ट्रेकर्सनाही माथेरान नेहमीच नवी आव्हाने देत असते.
रायगड जिल्ह्यातील पावसात पहावं असं आणखीन एक ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला रायगड किल्ला. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या राजधानीचे हे ठिकाण. मुंबई गोवा महामार्गावरील महाड येथून येथे जायला मार्ग आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड या गावी वाहन ठेऊन किल्ल्यावर जावं लागत. या किल्ल्याचा पावसाळ्यातील ट्रेक म्हणजे मनाचा ठाव घेणारा आणि शरीराचा कस पाहणारच असतो. येथील पायवाटेवरून पुढे जाताना कधी एखादा दगड आपल्या डोक्यचा वेढा घेईल आणि कपाळ मोक्ष होईल याचा नेम नाही. जसा किल्ला जवळ येतो तसा पावलातला वेग कमी होतो. शरीराला जडत्व येत. मात्र तुम्ही जेव्हा किल्यात पोहोचता तेव्हा तुमचं स्वागत इतिहासातला एक साक्षीदार करतो. मन पुन्हा भरारी घेत. पाऊस अंगावर झेलत आपण इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी पुढे पुढे चालायला लागतो.
महाड पासून काही अंतरावर पुढे मुंबईकडे जाताना उजव्या बाजूला डोंगरात लक्ष वेधून घेतात ती गांधार पाले लेणी.२८ लेण्यांच्या या समूहात बुद्ध मूर्ती, ३ चैत्यगृह, विहार, स्थंभ, शीला लेख, स्तूप,.ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, पाली भाषेतील शिलालेख यांचा समावेश आहे. लेण्यातील दगडी बाकावर बसून वरून कोसळणारे धबधबे आणि समोरून वाहणाऱ्या नदीचे विहंगम दृश्य पाहता येते. नदी किनारी वसलेले महाड शहर रिमझिम पावसात अनोखेच भासते.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण गाव जवळील पेढे या गावामध्ये असणारा हा धबधबा परशुराम मंदिराजवळील सह्याद्री पर्वतातून १०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरुन हा धबधबा कोसळतो. कड्यावरुन वेगाने कोसळणारा प्रचंड आवाज, पाण्याची खळखळ आणि त्यावर मस्ती करणारे पर्यटक यामुळे हा परिसर गजबजून गेलेला असतो. चिपळूण रेल्वे स्टेशनवरून येथे जात येते. मार्लेश्वर हे रत्नागिरीतील प्रसिद्ध ठिकाण. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या ठिकाणाचे पावसाळ्यातील सौंदर्य विलोभनीय असते. सह्याद्रीच्या कडय़ावरून कोसळणारा धारेश्वर धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना अक्षरश खेचून आणतो. मात्र पावसाळ्यात या धबधब्याजवळ जाणे अत्यंत धोकयचे असते हे पर्यटकांनी लक्षात घ्यायला हवं. मार्लेश्वरला जाण्यासाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनला उतरून जाता येते. हे अंतर ३२ किमी. आहे. रत्नागिरीचा भाटे समुद्र किनारा पावसाळ्यात प्रयतकानी बहरून जातो. समुद्राची गाज आणि पावसाची रिमझिम त्यातच लाटांचे उडणारे मस्त तुषार तरुणाईला आकर्षित करतात. रत्नागिरीहून येथे जात येते.
सिंधुदुर्ग जिल्हा हे पावसाच्या लहरी आविष्काराचे महेर घरचं. येथील पाऊस म्हणजे दूरदेशीच्या बाबालाही परत बोलवणार, आजीच्या गोधडीची उब काय असते याची आठवण करून देणारा, आईने मस्त भाजून दिलेल्या काजू तिने केलेले मासळीचे सार याची आठवण अगदी अनादी काळापर्यंत आपल्या मनात साठवून ठेवणारा असाच. पावसाळ्यात साद घालतो तो इथला घाट माथा. येथील कणकवली तालुक्यातील कोल्हापूरकडे जाताना लागणार फोड घाट म्हणजे निसर्गाच्या कुशीत शिरण्याचा महा मार्गच. या घाट माथ्यावर दाजीपूर अभयारण्य आहे. धुके आणि पावसासोबत विविध प्राणी पक्षी यांचे दर्शन येथे घेता येते. दाजीपूर तलावाचा मनोहारी किनारा, घनदाट वृक्ष राजी, वर्षानु वर्षाच्या वेली, गवात आणि फुलांचे जत्ते, पाऊस आणि वार्याचे गीत त्याला धबधब्यांची साथ हे सारे अनुभवत फिरताना येथे मुक्त विहार करणारे गवा रेडे ( बायसन ) वेगळाच अनुभव देऊन जातात. कणकवली आणि कोल्हापूर येथून या ठिकाणी जात येते.
देवगड येथील समुद्र किनारी पवनचक्की जवळचा पाऊस नेहमी आकर्षित करतो तो येथील कॉलेज तरुणाईला. समुद्राच्या बेफाम लाटा, हातातली छत्री घेऊन जाणारा वारा आणि मायेच्या ममतेने झोडणारा पाऊस दोन प्रेमिकांच्या दुभंगलेल्या मनाला जवळ आणणारा असाच. मुंबई गोवा मार्गावरील कणकवली जवळच्या नांदगाव येथून देवगड येथे जाता येते. नांदगाव रोड रेल्वे स्टेशनही सोईचे आहे.
सिंधुदुर्गला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यातील कुडाळ तालुक्यातलया तुळसुली गावाहून जात येणार रांगणा गड हा नेहमीच ट्रेकर्सना खुणावणारा आहे. पावसाच्या पानात ओढ्याचे रूप धारण केलेली पायवाट, घनदाट वनराई, जंगली स्वापदांचा मुक्त वावर, पाण्यासोबत खाली घरंगळत येणारे माती – दगड आणि केव्हाही पाय घसरून आपल्याला पोटात घेणारी खोल खोल दरी. असा हा ट्रेक कुणालाही धडकी भरवणाराच असा आहे. पावसाळ्यात येथे जाणे म्हणजे निसर्गाला आव्हानच देणे होय. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर ऐतिहासिक वस्तू पाहतानाच नजरेला पडतो तो येथी तलाव. चिंब भिजूनही या तलावात सूर मारावासा वाटतो. येथील रांगणाई मंदिर हे पावसात येथे येणाऱ्या पर्यटकांचे घरच. इतिहासातल्या पॉल खुनांचा वेध घेताना रांगणाई देवीच्या प्रांगणातच मग पावसाच्या सरी अनुभवणे एक अनोखा अनुभवच घेता येतो. कुडाळ रॉड रेल्वे स्टेशन वरून येथे खासगी वाहन किंवा एस ती बसने जात येते.
असा हा कोकणातला पाऊस जसा पर्यटन स्थळांवर जाऊन अनुभवता येतो तसाच तो गावात हि जाऊन अनुभवता येतो. पारंपरिक शेती, पावसातली मासेमारी, पावसातले कोकणी पदार्थ, कोकणातल्या रानभाज्या, वोढ्यातली मस्त अंगोळ, नदीतील डुबन, जंगलातील कंदमुळांचा आस्वाद असं सार काही कोकणातला पाऊस घेऊन येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here